Wednesday, April 24, 2024
Homeनगरबांधकाम व्यावसायिकांचा कृत्रिम वाळू ऐवजी नैसर्गिक वाळूकडे कल

बांधकाम व्यावसायिकांचा कृत्रिम वाळू ऐवजी नैसर्गिक वाळूकडे कल

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

नदीपात्रातून मिळणारी नैसर्गिक वाळू हीच घराच्या बांधकामासाठी चांगली असल्याने संगमनेर तालुक्यातील अनेक बांधकाम व्यावसायिक व घर बांधू इच्छिणार्‍या नागरिकांचा कल कृत्रिम वाळू ऐवजी नैसर्गिक वाळूकडे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाळू उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे प्रशासनाने वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

- Advertisement -

संगमनेर शहर व परिसरात गेल्या 15 वर्षांपासून बांधकामाची संख्या वाढली आहे. शहरातील विविध उपनगरात हजारो नवीन घरे तयार झाली आहेत. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती व घराचे बांधकाम सातत्याने सुरूच आहे. यामुळे बांधकामासाठी लागणार्‍या साहित्याची गरज वाढली आहे. या बांधकामासाठी वाळू हा महत्त्वाचा घटक असल्याने दररोज अनेक ब्रास वाळूची गरज भासते. संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा होत होता. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर भूमिका घेतल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. बेकायदेशीर वाळू उपशावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्याने वाळू उपशावर गेल्या काही महिन्यांपासून मर्यादा आल्या आहेत.

संगमनेर तालुक्यात वाळूची वाढती गरज लक्षात घेऊन काही व्यवसायिकांनी कृत्रिम वाळू पुरवठा सुरू केला आहे. ही वाळू दगडांपासून तयार केली जाते. तालुक्यातील काही स्टोन क्रेशरमध्ये अशा प्रकारची वाळू तयार करण्यात येते. नदीपात्रातील वाळूला पर्याय ठरणारी ही वाळू अनेकजण वापरत आहेत.

कृत्रिम वाळूच्या साह्याने केलेले बांधकाम फार वर्ष टिकत नसल्याची भावना नागरिकांची आहे. नदीपात्रातील नैसर्गिक वाळू हीच पक्क्या बांधकामासाठी योग्य असल्याने नदी पात्रातील वाळूकडे नागरिकांचा कल आहे. यामुळे कृत्रिम वाळू वापराचा पर्याय अनेक नागरिकांना मान्य नाही.

संगमनेर तालुक्यातील मुळा व प्रवरा नदी पात्रातून वाळू मिळावी यासाठी प्रशासनाने नियोजन करावे व नागरिकांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन नैसर्गिक वाळूचा पुरेसा पुरवठा केला जाईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

नैसर्गिक वाळूपेक्षा कृत्रिम वाळूचा भाव जास्त

संगमनेर तालुक्यात नैसर्गिक वाळू पेक्षाही कृत्रिम वाळूचा भाव जास्त आहे. एक ट्रॅक्टर नैसर्गिक वाळूला साडेतीन हजार रुपये द्यावे लागतात तर कृत्रिम वाळूसाठी साडेपाच ते सहा हजार रुपये पर्यंत भाव आकारला जातो. कृत्रिम वाळू बांधकामासाठी फारशी योग्य नसल्याचा अनेकांचा दावा आहे त्यात या वाळूला पैसेही जास्त द्यावे लागतात. यामुळे नैसर्गिक वाळूकडे अनेकांचा ओढा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या