आगमन-कौतुकापलीकडे…

jalgaon-digital
7 Min Read

बहुप्रतीक्षित चित्त्याचे भारतात आगमन झाले. सुमारे सात दशकांपूर्वी लप्त झालेला चित्ता हा पुन्हा भारताच्या जंगलात वेगाने दौडेल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. वातावरणात झालेल्या बदलांशी ते कसे जुळवून घेतात यावर त्यांचा पुढील प्रवास अवलंबून आहे. प्राण्यांना स्थलांतरीत करताना सर्वात मोठे आव्हान आहे त्यांची घरी परतण्याची इच्छा. मेंढ्या, पक्षी, मांजर यांसारखे प्राणी कोठेही भरकटले तरी घराकडे जाण्याचा रस्ता शोधतात. चित्त्यांनाही तशी ओढ लागल्यास…?

रंगनाथ कोकणेे, पर्यावरण अभ्यासक

जवळपास 13 वर्षांच्या ठाम वैश्विक प्रयत्नांनंतर अखेरीस भारताच्या भूमीत चित्त्यांचे आगमन झाले. वाघांसाठी सुरक्षित ठरलेली मध्य प्रदेशची भूमी चित्त्यांसाठी निवडण्यात आली आहे. मध्य प्रदेशात वाघांची संख्या सर्वाधिक म्हणजे 526 असून आता तेथील कुना उद्यान हे आठ चित्त्यांचे घर बनले आहे. जगातील प्राण्यांच्या कृत्रिम स्थलांतरातील सर्वात मोठे स्थलांतर घडवून आणले आहे. नामिबियातून आणलेले चित्ते 30 दिवसांच्या निगराणीनंतर जंगलात सोडण्यात येणार आहेत. जंगलातील वातारणात ते एकदा रुळल्यानंतर मादी चित्त्यालादेखील जंगलात सोडले जाईल. येत्या वर्षभरामध्ये पाचपैकी एक किंवा दोन मादी चित्ता पिल्लास जन्म देऊ शकतात. ते यशस्वी झाल्यास खर्‍या अर्थाने भारतात चित्त्यांनी बस्तान मांडले, असे म्हणता येऊ शकते.

पण ही बाब वाटते तेवढी सोपी नाही. चित्त्याचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी कुनो नॅशनल पार्कमध्ये सरकारने आवश्यक सुविधा केल्या आहेत, पण त्या या परदेशी चित्त्यांच्या किती पचनी पडतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कुनो पार्कमध्ये 500 हेक्टरच्या परिसरात चित्त्यांना शिकार करण्याची सोय करून देण्यात आली आहे. या ठिकाणी राज्यातील पेंच आणि नरसिंहगड वन्यजीव अभयारण्यातून 235 चितळ आणले आहेत, तसेच सुमारे 300 हरणं आणण्याची योजना आहे.

जवळपास 22 हजार प्राणी चित्त्यांसाठी या जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील दहा वर्षांत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून 50 ते 60 चित्ते आणण्याचे नियोजन आहे. जसजसे प्रजनन वाढेल तसतसे चित्ते आणण्याच्या योजनेवर काम सुरू होईल. नौरादेही वन्यजीव अभयारण्यासारख्या अन्य अभयारण्यात या चित्त्यांना राहण्याची सोय केली जाणार आहे.

चित्त्यांसाठी राबवण्यात आलेले हे अभियान अत्यंत स्वागतार्ह आहे. त्याला देशातील माध्यमांनीही प्रचंड प्रसिद्धी दिली आहे. सरकार आणि त्यांच्या समर्थकांनीही या ऐतिहासिक कामगिरीचे प्रचंड कौतुक केले आहे. हा प्रयोग स्वागतार्ह असला तरी तो अत्यंत जोखमीचाही आहे याचे भान बाळगले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रयोग अयशस्वी होता कामा नये. कारण संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागून राहिलेले आहे. आजघडीला जगात आता केवळ 7100 चित्ते राहिले आहेत. त्यांची संख्या सातत्याने कमी होत चालली आहे. आशिया खंडात केवळ इराणमध्ये 12 ते 40 चित्ते आहेत.

बहुतांश चित्ते हे पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वास्तव्यास आहेत. अंगोला, बोत्सवाना, मोझाम्बिक, नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि जाम्बिया येथे 4000 चित्ते आहेत, तर केनिया, टांझानियामध्ये जवळपास 1000 चित्ते आहेत. चित्ता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी मानला जातो. त्याचा वेग 80 ते 120 किलोमीटर प्रतितास इतका आहे. एक वयस्क चित्त्याचे वजन 70 किलोपर्यंत असू शकते. चित्ता हा सकाळी किंवा सायंकाळी शिकार करतो. तो हरण, ससा, शहामृग यांसारख्या प्राण्यांची शिकार करतो. सिंह, गिधाडापासून आपले अन्न वाचवण्यासाठी वेगाने त्याचे सेवन करतो.

चित्ता भारतातून नामशेष होण्यामागे अनेक कारणे आहेत. वाघांच्या तुलनेत चित्ते कमी धोकादायक आहेत. त्यामुळे तत्कालीन काळात चित्ता पाळण्यास सुरुवात झाली. त्याचा शांत स्वभाव हा त्याचे अस्तित्व संपण्यास कारणीभूत ठरला. मुघल आणि ब्रिटीश राजवटीच्या काळात शिकार्‍यांना सन्मान दिला गेला. त्यामुळे त्याकाळात खूप चित्ते मारण्यात आल्याचे सांगितले जाते.

भारतात 1947 मध्ये शेवटच्या चित्त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पाच वर्षांनंतर 1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याची घोषणा करण्यात आली. एका अहवालानुसार छत्तीसगडच्या कोरिया घराण्याच्या महाराजांनी 1947 मध्ये तीन चित्त्यांची शिकार केली. हे तीन चित्ते भारतातील शेवटचे चित्ते होते, असे म्हटले जाते. तथापि त्यांच्या वंशजांकडून या आरोपाचे खंडन केले जात आहे.

त्यांच्या मते, महाराजांनी तीन चित्त्यांची शिकार केली; परंतु ते शेवटचे चित्ते नव्हते. तथापि या वादापेक्षाही चित्त्याचे नामशेष होणे ही आपल्यासाठी अत्यंत दुर्दैवी बाब होती. त्यामुळेच आज जरी चित्त्यांचे आगमन झाले असले आणि भविष्यात त्यांची संख्या वाढली तरी त्यांच्या संगोपन, संवर्धनाची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडली जाणे नितांत गरजेचे आहे

अनेक दशकांपासून वन्यजीव प्राण्यांना प्राणीसंग्रहालयात आणण्याची प्रक्रिया केली जाते. जगभरातील दुर्गम भागातून या प्राण्यांना आणले जाते किंवा सोडले जाते. 1960 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून लुप्त होणारा पांढरा गेंडा एका देशातून दुसर्‍या ठिकाणी नेण्यात आला. भारतात 1984 मध्ये आसामच्या पोबितारा येथून उत्तर प्रदेशच्या दुधवापर्यंत गेंड्यांना नेण्यात आले. अलीकडेच काझिरंगा येथे गेंड्यांना स्थलांतरीत करण्यात आले. 2011 मध्ये जंगली म्हशीला कान्हातून बांधवगड येथे नेण्यात आले. पण जंगलातून आणलेल्या प्राण्यांना अभयारण्यात किंवा प्राणीसंग्रहालयात आणणे आणि त्यांना तेथील वातावरणात जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करणे ही बाब आव्हानात्मक आहे.

आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघाने 1995 रोजी वन्यजीव स्थलांतरासंबंधी दिशानिर्देश जारी केले आहेत. वन्यजीवांचे स्थलांतर हे स्थानिक पातळीवर असो किंवा एका देशातून दुसर्‍या देशात आणले जात असो, हे काम पूर्णपणे खबरदारी घेत करणे गरजेचे आहे. प्राण्यांना स्थलांतरीत करताना सर्वात मोठे आव्हान आहे त्यांची घरी परतण्याची इच्छा. मेंढ्या, पक्षी, मांजर यांच्या हालचालींवरून आपल्याला अनेक गोष्टी कळतात. ते कोठेही भरकटले तरी घराकडे जाण्याचा रस्ता शोधतातच.

कमी वयातील प्राणी असल्यास तो नव्या ठिकाणी लवकर रुळण्याची शक्यता अधिक राहते. हे लक्षात घेता आफ्रिकेतून भारतात नव्याने दाखल झालेले चित्ते इथल्या वातावरणात कसे रुळतात, ते कसे जुळवून घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. आफ्रिकेतील हवामान, पाऊसमान आणि भारतातील हवामान यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे ही जुळवून घेण्याची प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा प्रयोग यशस्वी करणे हे भारतापुढील मोठे आव्हान आहे. व्याघ्रसंवर्धन प्रकल्पाची सुरुवात पन्नास वर्षांपूर्वी झाली. तेव्हा वाघांची संख्या घटून 1800 पर्यंत पोहोचली होती.

1947 मध्ये ही संख्या 40 हजार असल्याचा अंदाज होता. व्याघ्रसंवर्धन प्रकल्पांचा फायदा असा झाला की, गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात वाघांची संख्या 3500 पर्यंत पोहोचली. परंतु नंतरच्या काळात पुन्हा याबाबत हलगर्जीपणा, दुर्लक्ष झाले आणि वाघांची संख्या घटत गेली. आज देशातील व्याघ्रसंवर्धन प्रकल्पांची संख्या 9 वरून 52 वर गेली आहे. शिकार्‍यांवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, वाघांची देखभालही चांगली घेतली जात आहे. त्यामुळे वाघांची संख्या 2900 वर पोहोचली आहे.

यातील सुमारे 1900 वाघच व्याघ्रसंवर्धन प्रकल्पांत आहेत. वाघांच्या संरक्षणाबाबत मध्यंतरीच्या काळात दाखवलेला हलगर्जीपणा चित्त्यांच्या बाबतीत जराही दाखवून चालणार नाही. कारण तसे झाल्यास भारताला यापुढे चित्ता देण्यास कोणीही तयार होणार नाही. त्यामुळे चित्त्यांबाबतच नव्हे तर एकंदरीतच वन्यजीवनांविषयी समाजमनात असणारे ममत्व वाढवण्याची गरज आहे.

देशात कधीकाळी हत्तींची संख्या लाखोंच्या घरात होती, आज ती केवळ 27,312 वर आली आहे. सिंह 674 उरले आहेत. ज्या भागात जे वन्यजीव आनंदाने राहत आहेत तेथे त्यांना राहण्यानुकूल वातावरण आणि सुरक्षितता प्रदान करणे ही आपली भूमिका असायला हवी. गुजरातच्या गिरमध्ये सिंह आनंदाने वास्तव्य करत आहेत. तशाच प्रकारे कुनोमध्ये जर चित्ते स्थिरस्थावर झाले, रुळले आणि आनंदाने नांदू लागले तर आपल्यासाठी ते खूप मोठे यश असेल. यासाठी आगमनाच्या कौतुकापलीकडे जाऊन काटेकोर प्रयत्न करावे लागणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *