वास्तुशास्त्र व दिशा

jalgaon-digital
3 Min Read

पूर्व दिशा – पूर्व दिशा ही उगवती दिशा असून या दिशेचा स्वामी किंवा प्रमुख देवता इंद्र आहे. इंद्राबरोबरच एकूण 9 देवता आहेत. पूर्वाभिमुख वास्तूमुळे सूर्याची किरणे रोज घरात येऊन वातावरणातील सूक्ष्म जीवजंतूंचा नायनाट होतो. तसेच ईश्वराची कृपा होते. आपल्या वास्तूमध्ये रोजचे रोज सूर्य प्रकाश येणे फार गरजेचे आहे. सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये डी जीवनसत्त्व असते. शिवाय त्याच्या प्रकाशामध्ये जीवनोपयोगी किरणे असतात. त्याचा निश्चित चांगला परिणाम मानवी जीवनावर होतो म्हणून पूर्वेला उत्कर्षाची दिशा असे म्हटले जाते. या दिशेला मुख्य द्वार आले तर उत्कर्षकारक मानले जाते.

पश्चिम दिशा – पश्चिम दिशेचा स्वामी वरूण आहे. वरूणांदीविहित देवता म्हणजे पाऊस. यावरूणाबरोबरच इतर 9 देवतांचा वास या दिशेला असतो. या दिशेला मुख्य द्वार आले असता जीवन समाधानी राहते.

उत्तर दिशा – लक्ष्मीचा भाऊ कुबेर याची ही दिशा असून उत्तराभिमुख वास्तू असेल तर भरभराट होते. कुबेरासमवेत असणार्‍या 7 देवता याही शुभ फलदायी आहेत. त्यामुळे उत्तराभिमुख वास्तू भरभराटीस येते.

दक्षिण दिशा – दक्षिण दिशा ही महत्त्वाच्या कामांना निषिद्ध मानली जाते. या दिशेची देवता आहे यम. यमदेव हे मृत्यूचे देवता आहेत. दक्षिणेला कधीही दिव्याचे तोंड केले जात नाही. जेव्हा कोणी मृत्यू पावतात तेव्हा दक्षिणेला तोंड करून दिवा लावतात म्हणजे दिव्याची वात दक्षिणेला असते. याशिवाय दिवाळीच्या एका दिवशी यमदीपदानाचा दिवस असतो. दक्षिणेलगतच्या इतर सात देवता असून शुभकार्याकरिता या दिशेस मान्यता नाही. पण सौंदर्यप्रसाधने, सुवर्ण अलंकार, कोळसा, टायरचे व्यवसाय यासारखे व्यवसाय दक्षिणेस भरभराटीस येतात.

प्रमुख चार दिशा झाल्यानंतर 4 उपदिशा आहेत. त्यांचे स्वामी कोण ते पाहू.

आग्नेय दिशा – पूर्व दिशा आणि दक्षिण दिशेच्या मध्ये आग्नेय दिशा असते. अग्री ही या दिशेची देवता आहे. आग्नेय कोपर्‍यातच वास्तूपुरूष निक्षेप करावा. आग्नेय कोपर्‍यात स्वयंपाकघर असावे किचन ओटा, पूर्वेस तोंड करून असावा. स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपर्‍यात गॅस किंवा चूल असावी. हॉलच्या आग्नेयास मुख्य दरवाजा असेल तर घरात विनाकारण कटकटी होतात. पण त्या किरकोळ असतात.

नैऋत्य दिशा – दक्षिण आणि पश्चिम कोपर्‍यातील दिशा नैऋत्य दिशा असते. या दिशेला प्रमुख द्वार कधीही नसावे. चोर्‍या होतात. या दिशेत अडगळ आणि जड वस्तू ठेवाव्या. नैऋत्य दिशेला या व्यतिरिक्त काहीही नको.

वायव्य दिशा – वायव्य या नावातच आपणास वायुदेवतेचा उद्बोध होतो. ही प्राणवायू निर्माणकर्ती दिशा मानली जाते. या दिशेला मोठी खिडकी असणे आवश्यक आहे. वायव्य दिशा भिंतीने, पडद्याने, पार्टीशन किंवा मोठी झाडे लावून अडवल्यास त्याचे अशुभ परिणाम मिळतात.

ईशान्य दिशा – ईशान्य स्वामी देवता ईश्वर आहे. ही दिशा पवित्र दिशा आहे. या दिशेला कोणतेही पवित्र कार्य करावे. अपवित्र कामासाठी या दिशेचा वापर करू नये. ईश म्हणजे ईश्वर आणि ईशान्य म्हणजे देवतांचे वास्तव्य असणारे घर.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *