Thursday, April 25, 2024
Homeनगरअर्बन च्यावतीने औटी होणार फिर्यादी

अर्बन च्यावतीने औटी होणार फिर्यादी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शतकोत्तरी वाटचाल करत असलेल्या नगर अर्बन बँकेतील अडीच कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली जाणार आहे. बँकेचे मॅनेजर मारूती रंगनाथ औटी हे फिर्याद दाखल करणार आहेत. तसे पत्र प्रशासकांनी आंदोलकांना दिले.

अर्बन बँकेत अडीच कोटी रूपयांचा अपहार करण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. 11 सप्टेंबरला ही तक्रार दिल्यानंतरही पोलिस गुन्हा दाखल करत नसल्याने राजेंद्र गांधी यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राकेश मानगावकर यांनी तक्रारीत तथ्य असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार बँकेने मुख्य शाखाचे मॅनेजर मारूती औटी यांना गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले आहे. तसे पत्र त्यांना प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे यांनी 18 डिसेंबरलाच दिले आहे. तरीही गुन्हा दाखल न झाल्याने राजेंद्र गांधी, पोपट लोढा, अनिल गट्टाणी, मनोज गुंदेचा यांनी प्रशासकाच्या दालनात आज ठिय्या दिला. या आंदोलनानंतर पोलिसांत फिर्याद देण्यासाठी औटी यांना प्राधिकृत केल्याच्या पत्राची प्रत मिश्रा यांनी आंदोलकांना दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

- Advertisement -

………………

आरोपीच्या नावाकडे नजरा

मारुती औटी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात यावा आणि कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा असे स्वतंत्र पत्रही बँकेचे प्रशासक मिश्रा व सीईओ शिंगटे यांनी पोलिसांना दिले आहे. त्यामुळे आता गुन्हा दाखल होणार असून आरोपीमध्ये कोणाच्या नावाचा उल्लेख होतो, याकडे नगरकरांच्या नजरा लागून आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या