पहिलीच्या वर्गासाठी प्रारंभिक भाषा विकास कार्यक्रम; विद्यापरिषदेचा विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प सुरू

पहिलीच्या वर्गासाठी प्रारंभिक भाषा विकास कार्यक्रम; विद्यापरिषदेचा विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प सुरू

नाशिक । प्रतिनिधी

शाळांमध्ये वाचन समृद्ध वातावरण तयार करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये भाषा, लिपी आणि ध्वनीचे ज्ञान प्रभावीपणे रुजविता यावे, शिक्षकांना त्यासाठी तंत्रशुद्ध मार्ग समजावा यासाठी शालेय शिक्षण विभाग राज्यस्तरावर पहिलीच्या वर्गांसाठी प्रारंभिक भाषा विकास कार्यक्रम राबविणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्यापरिषद) भाषा विभागाने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या राज्यस्तरीय पथदर्शक प्रारंभिक भाषा विकास कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील, उपसंचालक डॉ. शोभा पवार, भाषा विभागप्रमुख जगराम भटकर, सचिन लोखंडे, संदीप वाक्चौरे यावेळी उपस्थित होते.“शिक्षणाचा विचार करताना अजूनही लेखन, वाचनाच्या पलीकडे आपण जाऊ शकलेलो नाही. त्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला साध्य कराव्या लागणार आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक आंतरप्रक्रिया महत्त्वाची असून, त्यासाठी द्यावयाच्या अध्ययन अनुभवाची भूमिका जाणून घेऊन शिक्षकांनी वर्गात सक्षमपणे अध्यापन करण्याची गरज आहे.

शिक्षक शाळेत येताना श्रवण भाषणाची प्रक्रिया पूर्ण करून येत असले, तरी वाचन, लेखनचा विचारी होण्याची गरज आहे.’असे पाटील यांनी सांगितले. राज्यात या वर्षी पथदर्शक स्वरूपात प्रत्येक तालुक्यातील एक शाळा निवडून तेथे हा कार्यक्रम राबविला जाईल. यातून विद्यार्थ्यांमध्ये लिपीचे ज्ञान, भाषा आणि वाचन समृद्ध वातावरण निर्मिती होईल. तसेच वर्गात अध्यापन करताना विद्यार्थ्यांना नेमके काय आणि कसे द्यायचे, याचे तंत्र शिक्षकांना समजेल, अशी माहिती विद्यापरिषदेचे भाषा विभागप्रमुख जगराम भटकर यांनी सांगितले आहे.

प्रमुख मुद्दे

राज्यात 408 तालुक्यात 1 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी
वर्षभरात त्याची परिणामकारकता तपासणार
कार्यक्रमाच्या यशानंतर पुढील वर्षी राज्यस्तरावर
पहिलीच्या विद्यार्थ्याचे शिकणे गतिमान होण्यास मदत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com