Friday, April 26, 2024
Homeनाशिकडॉक्टर, रुग्ण हितासाठी संघटना प्रयत्नशील - डॉ. पिंगळे

डॉक्टर, रुग्ण हितासाठी संघटना प्रयत्नशील – डॉ. पिंगळे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जीएसटी,आयआरडीएची नियमावली व अन्य कारणांमुळे रुग्णांवर अप्रत्यक्षपणे उपचार खर्चाचा भार येणार आहे. या सर्व त्रुटींबाबत रुग्णांना विश्वासात घेऊन त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.सुहास पिंगळे (Indian Medical Association Maharashtra State President Dr. Suhas Pingle) यांनी केले.

- Advertisement -

इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखा आणि नाशिकरोड शाखा ( IMA Nashik & Nashikroad) यांच्या वतीने आयएमए भवन येथील डॉ. एच. एस. जोशी सभागृहात आयोजित केलेल्या ‘अ‍ॅम्सकॉन 2022’ या परीषदेच्या (Amscon 2022′ conference)उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आयएमए महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉ.मंगेश पाटे, नियोजित अध्यक्ष डॉ.रवींद्र कुटे, आयएमए एएमएसचे राज्यस्तरीय चेअरमन डॉ.स्नेहल फेगडे, आयएमए एएमएसचे राज्यस्तरीय सचिव डॉ.हेमंत सोननीस, नाशिक आयएमए अध्यक्षा व आयोजन समिती अध्यक्षा डॉ.राजश्री पाटील, सचिव डॉ.विशाल पवार, डॉ.किरण शिंदे, डॉ.विशाल गुंजाळ, नाशिकरोड आयएमएचे अध्यक्ष डॉ.प्रशांत भुतडा, सचिव डॉ. रेश्मा घोडेराव, डॉ.गीतांजली गोंदकर, डॉ.माधवी मुठाळ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला आयएमए प्रार्थना करण्यात आली. यानंतर डॉ.प्रशांत भुतडा यांनी सर्व सहभागींचे स्वागत केले. प्रास्ताविकात डॉ.राजश्री पाटील म्हणाल्या, असंसर्गजन्य आजार या संकल्पनेवर होत असलेल्या या परीषदेला राज्यभरातून डॉक्टरांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. विशेषतः मधुमेहासारखे आजार गंभीर होत असून, याबाबत वैद्यकीय क्षेत्राला जागृत करण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरेल,असा विश्वास व्यक्त केला.

डॉ.स्नेहल फेगडे यांनी परिषदेचे अत्यंत उत्कृष्ट आयोजन नाशिकच्या टीमने केले असल्याचे सांगून कौतूक केले. एएमएसच्या वतीने विविध सर्टिफीकेट कोर्स उपलब्ध असून, त्याचा लाभ डॉक्टरांनी घेण्याचे आवाहन केले. डॉ.रवींद्र कुटे यांनी देशभरातून 2 हजाराहून अधिक डॉक्टर्स एएमएसशी जोडले गेले आहेत.फेलोशिपचा लाभ घेतांना अनेक डॉक्टरांनी आपले ज्ञान अद्ययावत केलेले आहे.

नाशिकची परीषद अत्यंत उत्कृष्टरित्या पार पडली असल्याचे सांगितले. डॉ.मंगेश पाटे यांनी जीएसटी, आयआरडीए यांच्या वतीने कॅशलेस संदर्भात जाहीर केलेले धोरण रुग्णहितासाठी मारक आहेत. संघटना आपल्या वतीने या मुद्यांवर लढा देत असून, त्यास डॉक्टरांनी साथ देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाप्रसंगी आयएमए महाराष्ट्रचे खजिनदार डॉ.राजीव अग्रवाल, सचिव डॉ.अनिल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन डॉ.स्नेहल भामरे, डॉ.सुलभा पवार यांनी केले. डॉ.विशाल पवार यांनी आभार मानले.

उद्घाटन कार्यक्रमाच्या आधी सकाळी 9 वाजेपासून वेगवेगळ्या विषयांवर सत्र झाले. डायबेटिस विषयावर पहिला परिसंवाद झाला. यानंतरही विविध तांत्रिक सत्रांतून सहभागी डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात आले. सायंकाळनंतर गाला बॅक्वेट हॉलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या