Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमुख्याधिकार्‍यांवरील आरोप राजकीय हेतून; महिला नगरसेविकांचे पत्रक

मुख्याधिकार्‍यांवरील आरोप राजकीय हेतून; महिला नगरसेविकांचे पत्रक

सिन्नर। Nashik (प्रतिनिधी)

नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार महिला नगरसेविकांना अपमानास्पद वागणूक देतात असा करण्यात आलेला आरोप दबावतंत्रासाठी राजकीय हेतूने करण्यात आला असल्याचा प्रति आरोप सत्ताधारी महिला नगरसेविकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

- Advertisement -

एकीकडे मुख्याधिकार्‍यांकडून कामे करून घेतली जातात व दुसर्‍या बाजूला त्यांचे मनोबल कमी करण्यासाठी त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप केले जातात. हे सगळे राजकीय षडयंत्र असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

मुख्याधिकारी केदार यांची मुदतपूर्व बदली करण्याचा प्रयत्न यापूर्वी राजकीय हेतूने करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करून ही बदली रद्द केली.

करोनाच्या संकटात व त्याआधीही चांगले काम करत केदार यांनी आपली छाप पाडली आहे. ते सहन होत नसल्यानेच केदार यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर, बदनामीकारक आरोप केले जात असल्याचे या नगरसेविकांनी म्हटले आहे.

मुख्याधिकारी केदार हे कुठल्याही प्रकारे सत्ताधारी व विरोधक असे भेदाभेद करत नाहीत. आमच्या आधी विरोधकांची कामे मार्गी लावतात. ते चांगले काम करत असताना वातावरण गढूळ करण्यासाठी जाणीवपूर्वक असत्य आरोप केले जात आहेत.

या हीन राजकारणापायी नागरिकांचे नुकसान होते याकडे आरोप करणार्‍यांनी लक्ष द्यावे व बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे असे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे. त्यावर माजी नगराध्यक्षा मंगला शिंदे, नगरसेविका विजया बर्डे, नलिनी गाडे, प्रतिभा नरोटे, सुजाता भगत, प्रणाली गोळेसर, ज्योती वामने यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या