मद्यपी सेवकांचा ‘देशदूत’ प्रतिनिधीवर हल्ला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या ‘देशदूत’च्या प्रतिनिधीवर महापालिकेच्या मद्यपी अधिकारी व सेवकांनी हल्ला करत बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. संशयितांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

नवीन नाशिक पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता ललित भावसार, कर्मचारी शैलेश रमेश झिटे, अक्षय दीपक निकम, ज्ञानेश्वर सखाराम शिंदे अशी मारहाण करणार्‍या संशयितांची नावे आहेत. देशदूतचे नवीन नाशिक येथील प्रतिनिधी निशिकांत पाटील हे वार्तांकनासाठी पाथर्डीफाटा परिसरात गेले होते.

यावेळी तेथे चौघे संशयित जलकुंभाच्या प्रतिबंधीत क्षेत्राच्या आवारात मद्यपान करताना दिसून आले. पाटील यांना तेथे पाहताच याचा राग आल्याने चौघांनी पाटील यांना पत्रकार खूप माजलेत, त्यांची जिरवायला हवी असे बोलून, शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच पाणी सोडण्याच्या लोखंडी पाईपने हल्ला केला. पाटील यांनी हातावर पाईप झेलल्याने बालंबाल बचावले, यामध्ये ते जखमी झाले आहेत. तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. दुचाकी जमा करून घेण्याचा प्रयत्न केला. पाटील यांच्या तक्रारीवरून संबंधितांवर अंबड पोलीस ठाण्यात पत्रकार मारहाण प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याचा तपास सहायक आयुक्त अशोक नखाते करत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टाकीभोवती असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात कायद्याचे उल्लंघन करून सदर अधिकारी, कर्मचारी मद्यपान करत होते.तसेच पत्रकार वार्तांकनासाठी गेले असता त्यांना मारहाण केली गेली. ही बाब अतिशय गंभीर असून याचा विविध पत्रकार संघटना तसेच सर्व स्तरातून तीव्र निषेध होत आहे. तसेच संबंधितांवर निलंबनाची तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

आयुक्तांकडून गंभीर दखल

बुधवारी रात्री ‘देशदूत’ प्रतिनिधी निशिकांत पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची माहिती आयुक्तांना समजताच त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आयुक्तांकडे संबंधितांवर विभागाअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी ‘देशदूत’ने केली आहे. या मागणीनुसार आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांना चौकशीचे आदेश दिले असून कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *