Wednesday, April 24, 2024
Homeनगरअकोल्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र कडकडीत बंद

अकोल्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र कडकडीत बंद

अकोले |प्रतिनिधी| Akole

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरात विक एन्ड लॉकडाउनला

- Advertisement -

अकोलेकरांनी काल शनिवारी उत्तम प्रतिसाद दिला. सकाळ व सायं. दूध डेअरी वर येणार्‍या दूध उत्पादक व काहींचा अपवाद वगळता शहर व परिसरात शुकशुकाट जाणवत होता.

तालुक्यातील प्रमुख गावांत देखील असेच आशादायी चित्र पहावयास मिळत आहे. येथील महात्मा फुले चौकात पोलीस यंत्रणा ही विनाकारण फिरणार्‍या नागरिकांना अडवून विचारणा करताना दिसत होती. बसस्थानक परिसरात पूर्णपणे शुकशुकाट होता, तसेच बाजारपेठेत सर्वत्र शांतता दिसत होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय कडकडीत बंद होते.

अगस्ति सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांनी ऊस तोडणी कामगार, कारखान्याचे कामगार, अधिकारी यांची काळजी घेण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केलेल्या दिसत आहे. ऊस तोडणी कामगार उसाच्या गाडीवर मास्क लावून बसलेले दिसत आहेत. यावरून त्यांना करोनाचे गांभीर्य लक्षात आल्याचे दिसते. मात्र काही सुशिक्षित नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहेत.

जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशानुसार तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक अभय परमार, उपनिरीक्षक दीपक ढोमने, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले शहर व परिसरात विक एन्ड लॉकडाऊन पाळण्यात आला. या पूर्वीच तालुक्यातील सर्व आठवडे बाजार, शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आलेले आहेत. असे असतानाही तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही.

ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत आहे. सध्या खानापूर येथे आदिवासी वसतिगृहात करोना रुग्णांसाठी कोव्हीड सेंटर सुरू आहे. रुग्णांवर तेथे उपचार सुरू आहेत. करोना रुग्ण सापडल्यास त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना करोना टेस्ट करण्यास सांगितले जात आहे. ही गरज आहे. मात्र त्यामुळे सर्वांची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर शेजारी, नातेवाईक कोणीही जवळ मदतीला येत नसल्याने घर कसे चालवायचे, जनावरांना चारा कोणी द्यायचा असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

डॉ. भांडकोळी यांचे हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये व संगमनेर येथील अनेक ठिकाणी करोना रुग्णांसाठी बेडच शिल्लक नसल्याचे समजते. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक व प्रशासन चिंतेत दिसत आहे. येथील वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या तरुण डॉक्टर यांनी एकत्रित येत अगस्ति पतसंस्थेचे संचालक रमेश आरोटे यांचे माऊली क्रीटीकेअर हॉस्पिटलमध्ये 50 बेडची व्यवस्था झाल्याने करोना रुग्णांना दिलासा मिळत आहे. तर साई जीवन हॉस्पिटल येथेही कोव्हीड सेंटर सुरू झाल्याने तेथे 15 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचाही फायदा अकोलेकरांना होत आहे.

अकोलेमध्ये किमान 200 बेडचे मोठे कोव्हीड सेंटर होण्याची नितांत गरज आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाखाली काही तरुण कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर शहरातील मंगल कार्यालय, शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा येथेही कोव्हीड सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने तहसीलदार मुकेश कांबळे, मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे, समाजिक कार्यकर्ते सचिन शेटे व त्यांचे सहकार्‍यांचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाले तर अकोलेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्या वाढत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे व सामाजिक अंतर पाळणे याबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात आहे. शनिवार व रविवार 100 टक्के लॉकडाऊन यशस्वी होण्यासाठी रिक्षा फिरवून कडकडीत बंदचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

राज्य शासनाने शनिवार-रविवारला जोडून जर दोन-तीन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला तर मात्र सर्वसामान्य जनता, मोलमजुरी करणार्‍या वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. त्यांच्यासाठी आत्ता पासून काही योजना आखणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासन व सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था यांनी मदतीसाठी पुढे येण्याची नितांत गरज निर्माण होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या