Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारवन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी ; अक्कलकुवा येथील कृषि विस्तार अधिकार्‍यास अटक

वन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी ; अक्कलकुवा येथील कृषि विस्तार अधिकार्‍यास अटक

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

वाघासारख्या वन्य प्राण्यांच्या कातडयांची तस्करीप्रकरणीसागबारा पोलिसांनी अक्कलकुवा येथील कृषी विस्तार अधिकार्‍यास अटक केली आहे. गेल्या पंधरा दिवसात बोरद परिसरात मृत बिबटे आढळून आले असून एका बिबटयाला जाळयात अडकविण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व घटनांचा कातडी तस्करीशी काही संबंध तर नाही ना? असे प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात राज्यातील राजपिपला येथील पोलिस उपअधीक्षक राजेश परमार व मंडळ पोलिस निरीक्षक पी.पी.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व कर्मचार्‍यांचे पथक गुजरात राज्यातील सेलंबा सागबारा येथील धनसेरा येथे वाहनाची तपासणी करीत होते.

त्यावेळी महाराष्ट्राकडून येणार्‍या पांढर्‍या रंगाच्या टाटा हॅरियर कार (क्र. एमएच.१८, सीव्ही ४११४) ला थांबविण्याचा इशारा देण्यात आला. मात्र, चालकाने वाहन थांबवले नाही. सागबारा पोलिस ठाण्यासमोरील महामार्गावर पोलिसांनी कारला रोखले.

त्या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डिकीत एका मोठ्या राखाडी, पिवळ्या आणि पांढर्‍या जुन्या टॉवेलमध्ये गुंडाळलेल्या काळ्या पिशवीत वाघासारख्या वन्य प्राण्याचे कातडे आढळून आले.

याप्रकरणी सागबारा पोलिसांनी अक्कलकुवा येथील पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी किशोर भट्ट अहिरे (वय ४०, रा. नेर, कुसुंबा ता. धुळे) यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आरएफओ सागबरानो करीत आहेत.

महाराष्ट्रातून गुजरात राज्यात वाघासारख्या वन्य प्राण्याचे कातडे तस्करी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वन्य प्राण्यांच्या तस्करी प्रकरणी कृषी विस्तार अधिकार्‍यास अटककरण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.

दरम्यान, गेल्या पंधरवाडयात तळोदा तालुक्यातील मोड, बोरद परिसरात दोन बिबटे मृत अवस्थेत आढळून आले होते तर एका बिबटयाला शिकारीच्या जाळयात अडकविण्यात आले होते. याशिवाय परिसरात वारंवार बिबटे आढळत असतात.

त्यामुळे बोरद परिसरात बिबटयांची शिकार करुन त्यांच्या कातडीची तस्करी तर केली जात नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. तसे असल्यास हा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या