Friday, April 26, 2024
Homeनाशिकखरीप पेरणीसाठी शेती मशागतीच्या कामांना गती

खरीप पेरणीसाठी शेती मशागतीच्या कामांना गती

अंबासन । वार्ताहर

यंदा रोहिण्या चांगल्या बरसल्याने उल्हासित असलेल्या शेतकरी बांधवांना मृग नक्षत्राच्या पावसाने वेळेवर दमदार हजेरी दिल्याने मोठा दिलासा मिळाला. बागलाण तालुक्यात अंबासनसह मुल्हेर, जायखेडा, नामपूर आदी भागात मृगाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक नाले खळाळून वाहू लागले असून संततधार पावसामुळे अनेक शेतात पाणी साचल्याचे चित्र दिसून आले.

- Advertisement -

रोहिणीपाठोपाठ मृगाने देखील अनेक ठिकाणी चांगली हजेरी लावली असल्याने खरीप पेरणीच्या कामांना शेतकर्‍यांनी गती दिल्याने शेतशिवार पुन्हा माणसांच्या गर्दीने फुलू लागले आहे.

करोना उद्रेकामुळे दीड ते दोन महिने व्यावसायिक दुकानांबरोबरच शेतीची कामे देखील जवळपास ठप्प होती. करोना संक्रमणाच्या धास्तीने शेतमजूर कामावर जाण्यास धजावत नव्हते तर अनेक ठिकाणी शेतकरीच मजुराऐवजी स्वत:च सर्व कामे करून घेत असल्याचे चित्र होते.

लॉकडाऊनचा व्यापारी प्रतिष्ठानांबरोबरच सर्वाधिक फटका शेतमालास बसला. वाहतूक सेवा व बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल विक्रीसाठी बाजारात नेतांना शेतकर्‍यांचे हाल झाले. तसेच बाजार बंद असल्याने मातीमोल किंमतीत शेतमाल शेतकर्‍यांना विकावा लागल्याची वेळ लॉकडाऊनमुळे आल्याने बहुतांश शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

रोहिणी नक्षत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्यानंतर मृग नक्षत्रात देखील अंबासनसह वीरगाव, जायखेडा, वनोली, भंडारपाडे, आव्हाटी आदी अनेक गावात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जोरदार पावसामुळे अंबासन, वीरगाव परिसरातील नाल्यांना जोरदार पाणी येवून ते दुथडी वाहू लागले. वादळी वारे विजांच्या कडकडाटासह मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी दिल्याने आंबा, मिरची, टोमॅटो आदी भाजीपाल्याचे शेतकर्‍यांचे नुकसान झाले. दरम्यान, रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेती मशागतीच्या कामांना शेतकर्‍यांनी मोठ्या उत्साहात प्रारंभ केला आहे. अनेक गावांमध्ये अद्याप दमदार पावसाची अद्याप शेतकर्‍यांतर्फे प्रतीक्षा केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या