Saturday, April 27, 2024
Homeनगरबाधित क्षेत्रांचे सरसकट पंचनामे करावेत - ना. विखे पाटील

बाधित क्षेत्रांचे सरसकट पंचनामे करावेत – ना. विखे पाटील

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने शेतकर्‍यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे काम करावे. येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील नुकसान झालेल्या काही भागांना भेटी देऊन पाहणी करणार आहे. यावेळी सर्व शासकीय यंत्रणेने उपस्थित रहावे, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिडी येथे अधिकार्‍यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीतून केल्या.

- Advertisement -

जिल्ह्यात झालेली अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, पशुधनावरील लम्पी आजार व आनंदाचा शिधा कीट वाटपाचा आढावा पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी शिर्डी येथून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अहमदनगर येथून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप उपस्थित होते. तर शिर्डी येथून अप्पर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, प्रांतधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यांची माहिती सांगितली.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, जून ते सप्टेंबर या महिन्यात झालेल्या पावसापेक्षा सर्वाधिक पाऊस ऑक्टोबर महिन्यात झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शेवगाव, जामखेड, राहुरी, नेवासा, कोपरगाव या तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र प्रभावित झाले आहे. सोयाबीन पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तेव्हा प्रशासनाने सरसकट शंभर टक्के पंचनामे करण्याचे काम करावे. दिवाळी असताना मी स्वत: काही तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाना भेटी देणार आहे. यावेळी पशुसंवर्धन अधिकार्‍यांपासून तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक अशा सर्व तालुका शासकीय यंत्रणेने उपस्थित रहावे.

पशुधनावरील लम्पी चर्मरोग आजारात पशुधनाचा मृत्युदर वाढत आहे. तेव्हा सर्वच तहसीलदारांनी यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. लम्पी लसीकरण व जिल्ह्यात उपलब्ध औषधे याचा प्रशासनाने आढावा घ्यावा, अशा सूचना ही यावेळी महसूलमंत्र्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. शासनाच्या आनंदाच्या शिधा या कीट वाटपाचा पालकमंत्री विखे पाटील यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यात 4 लाख 90 हजार 685 कीट आनंदाचा शिधा कीट प्राप्त आहेत. हे कीट दिवाळीपूर्वी गोरगरीब लाभार्थ्यांपर्यंत पोहचले पाहिजेत. यासाठी प्रशासनाने कामात अधिक सुसूत्रता आणत प्रभावीपणे काम करावे. अशा सूचनाही ना. विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या