Tuesday, April 23, 2024
Homeनगरअपहरण झालेल्या बाळाची तीन तासात सुटका

अपहरण झालेल्या बाळाची तीन तासात सुटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रविवारी दुपारी नवनागापुरातील चेतना कॉलनी येथून अपहरण केलेल्या साडेतीन वर्षाच्या बाळाची एमआयडीसी पोलिसांनी तीन तासांत सुटका केली आहे. अपहरण झालेल्या बाळाच्या आईने डायल 112 नंबरवर संपर्क केल्याने एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ दखल घेत बाळाला मेहकरी (ता. नगर) येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी महिलेले दिलेल्या फिर्यादीवरून अपहरण करणार्‍याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र बबन थोरात (रा. शेवगाव) असे त्याचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

फिर्यादी महिला चेतना कॉलनीमध्ये दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भाडोत्री खोली बघण्यासाठी गेल्या असता त्यांच्यासोबत साडेतीन वर्षांचा मुलगा प्रतिक होता. फिर्यादी भाडोत्री रूम पाहत असताना त्यांचा मुलगा रस्त्यावर उभा होता. फिर्यादी रूम पाहून खाली आल्यावर त्यांना मुलगा दिसला नाही. त्यांनी आजुबाजुला पाहिले असता मुलगा प्रतिक मिळून आला नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, थोड्या वेळापूर्वी एक 30- 32 वर्षाचा एक इसम त्याला त्याच्या बरोबर घेऊन गेला आहे. यावर फिर्यादी यांची खात्री झाली की, मुलास कोणीतरी इसमाने पळवून नेले आहे. त्यांनी लगेच डायल 112 नंबरवर फोन करून मुलगा प्रतिक यास एका अनोळखी इसमाने पळवून नेले असल्याची माहिती दिली. कंट्रोलवरून एमआयडीसी पोलीस ठाण्याला फोन प्राप्त होताच सहा. निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी, तात्काळ एक पथक तयार करून तपासाबाबत सूचना केल्या.

पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर घटनेबाबत माहिती घेतली असता त्यांना मेहकरी (ता. नगर) गावचे बसस्थानक परीसरात एक इसम एका लहान मुलासह संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. याठिकाणी तात्काळ पोहचून मेहकरी गावच्या बसस्थानक परिसरात शोध घेतला असता देवेंद्र बबन थोरात हा मुलासह मिळून आला. थोरात याच्या ताब्यातून मुलाची सुटका करण्यात आली असून त्याला आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी सहायक निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गायकवाड, अंमलदार सांगळे, मिसाळ, सानप, देशमुख, शिंदे, पठाडे, सायबर सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुड्डू व दक्षिण विभागाचे मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार नितीन शिंदे यांच्या पथकाने केलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या