बारावीच्या परीक्षांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि बारावीच्या परीक्षा होणार असे सांगण्यात आले. परंतु, बारावीची परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार याबाबत राज्य सरकारने कोणतीही स्पष्टता अद्याप केलेली नाही.

त्यामुळे राज्यात बारावीच्या जवळपास 13 लाख तर नगर जिल्ह्यात सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जेईची परीक्षा जुन-जुलैमध्ये होणार असल्याने त्याच दरम्यान, बारावीची परीक्षा होण्याचा अंदाज शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास 12 लाख 73 हजारांहुन अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात जिल्ह्यातील सुमारे 60 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यात करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय 12 एप्रिल रोजी जाहीर केला होता.

मात्र, त्यानंतर राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षेबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय 20 एप्रिल रोजी जाहीर केला. या निर्णयानुसार दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने 12 एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयात बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील, असे सांगितले होते. मात्र, या परीक्षेबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. मात्र, आता एप्रिल महिना संपत आला, असतानाही बारावीच्या परीक्षा कधी होणार, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षा पद्धती याबाबत कोणतीही सूचना राज्य सरकार किंवा राज्य शिक्षण मंडळाकडून न आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही संभ्रमात पडले आहेत.

परीक्षेबाबत ठोस निर्णय हाती येत नसल्याने विद्यार्थ्यांचा ताण दिवसागणिक वाढत असल्याचे निरीक्षण पालक आणि शिक्षक नोंदवित आहेत. सध्या विद्यार्थ्यांचा अभ्यास, उजळणी अंतिम टप्प्यात आहे. असे असताना परीक्षेचे वेळापत्रक हाती असल्यास नियोजनबद्ध अभ्यास आणि अभ्यासातील सातत्य राखण्यास मदत होते. पण आता आणखी कितीवेळ परीक्षेची वाट पाहायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे.

बारावीचे वर्ष हे पुढील अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचे असते. विद्यार्थी पारंपारिक पदवी अभ्यसक्रमाबरोबरच औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, विधी अशा विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांची तयारी करत असतात. त्यामुळे आगामी काळात होणार्‍या प्रवेश परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने बारावीच्या परीक्षेचे नियोजन वेळेत करणे गरजेचे आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण वाढणार नाही, याचीही दक्षता घ्यायला हवी.

उशीरा का होईना, बारावीच्या परीक्षा घ्याव्याच लागणार आहेत. या परीक्षेवर पदवी अभ्यसक्रमाबरोबरच औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, विधी अशा विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांची तयारी अवलंबून असते. करोना प्रभाव कमी झाल्यावर या परीक्षा व्हाव्यात. मुख्याध्यापक महामंडळ बारावीच्या परीक्षा सुरळीत व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहे.

– प्राचार्य, सुनील पंडित, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *