Thursday, April 25, 2024
Homeनगरदहा महिन्यांनंतर गजबजल्या शाळा

दहा महिन्यांनंतर गजबजल्या शाळा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दहा महिने बंद असलेल्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग शासनाच्या आदेशानुसार भरवण्यास काल पासून सुरुवात झाली.

- Advertisement -

शहरातील अनेक शाळांमधून पहिल्या दिवशी बर्‍यापैकी विद्यार्थी उपस्थित होते. अनेक विद्यार्थी उत्साहाने शाळेत आले तर पालक सुद्धा आपल्या मुलांना शाळेत पाठवायला आतुर झालेले दिसले. शाळेमध्ये आल्यानंतर मुलांची थर्मल गन तसेच ऑक्सीमीटरने तपासणी करण्यात आली. तसेच सॅनिटायझरने विद्यार्थ्यांचे हात स्वच्छ करण्यात आले. काही शाळांमधून मुलांना मास्कचे वाटप देखील करण्यात आले.

पहिल्याच दिवशी विविध अधिकार्‍यांनी विविध शाळांना भेटी देऊन पट व उपस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातून माहितीसाठी सारखे फोन शिक्षण मंडळ व पंचायत समितीच्या शिक्षण विभागात खणखणत होते. पालकांनी संमतीपत्र भरून दिल्याने शिक्षकांचा बराचसा ताण हलका झाल्याचे दिसून येत होते. पंचायत समितीने उत्कृष्ट नियोजन करून शहर व तालुक्यातील पाच ते सातच्या वर्गाच्या सर्व शिक्षकांच्या आरटीपिसीआर चाचण्या करून घेतल्या.

काल अखेर सहा लॉटमधून अडीचशेच्या आसपास शिक्षकांच्या चाचण्यांसाठी स्वॅब घेण्यात आले असून पहिल्या व दुसर्‍या लॉटचे चाचण्यांचे अहवाल देखील प्राप्त झाले आहेत .आज आणि उद्या पुन्हा शिक्षकांच्या तपासण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये स्वॅब घेतले जाणार असून त्यानंतर मात्र जे शिक्षक राहतील त्यांना स्वखर्चाने तपासण्या कराव्या लागतील असे गट शिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांनी सांगितले.

शहरातील शाळांमध्ये आज पाच ते सात वर्गाचे विद्यार्थी बर्‍यापैकी हजर होते. आज पहिल्या दिवशी साधारणपणे तीस टक्के विद्यार्थी उपस्थित राहिले. यामध्ये आता दररोज वाढ होण्याची शक्यता आहे असे न. पा. शाळा क्र. 5 चे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी सांगितले . मोठ्या वर्गामधून जागेची व वर्गाची कमतरता लक्षात घेऊन एका बेंचवर एक विद्यार्थी बसविण्याचे नियोजन करण्यात आले असून दररोज 50 टक्के विद्यार्थी प्रत्येक वर्गात हजर राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात आले आहे. दररोज तीन तास शालेय कामकाज चालणार असून या काळात प्रामुख्याने इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांचे अध्यापन वर्गातून केले जाणार आहे उर्वरित विषयांचे अध्यापन ऑनलाईन गृहपाठ देऊन घरी केले जाणार आहे .शिक्षक आणि पालक दोघांनी मुलांची काळजी घेऊन काही अघटित घडणार नाही यासाठी शाळा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.

नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे तसेच पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, शिक्षण विस्ताराधिकारी मंदा दुर्गुडे ,सर्व केंद्रप्रमुख यांनी आपापल्या विभागात भेटी देऊन पहिल्या दिवशी शाळेतील पाच ते सात वर्गाच्या उपस्थितीचा तसेच शाळेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. राज्यामध्ये मागील महिन्यापासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले तसेच कालपासून इयत्ता पाच ते सात चे वर्ग सुरू झाले असून नजिकच्या काळामध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग देखील सुरू होतील अशी अपेक्षा शिक्षक-पालक यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या