Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनववी-बारावीचे वर्ग होणार सुरू! ४० मिनिटांच्या चार तासिका

नववी-बारावीचे वर्ग होणार सुरू! ४० मिनिटांच्या चार तासिका

नाशिक | प्रतिनिधी

नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. एक दिवसाआड ४० मिनिटांच्या चार तासिका घेण्यात येणार असून, शाळेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे…

- Advertisement -

राज्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. स्थानिक प्रशासनाने शाळा भरवताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना यापूर्वी शिक्षण विभागाने जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे पालन होते आहे की नाही, याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत.

शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्हा प्रशासन व महापालिकेद्वारा शिक्षकांची आरोग्य तपासणी होणार आहे. शाळेतील वर्ग खुल्या मैदानावर, मोकळ्या जागेत घेण्याची मुभा शाळा व्यवस्थापनाला दिली आहे. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्यवस्थापक व सरकार यांच्या सामुदायिक जबाबदारीवर एक दिवसआड शाळा भरवण्यात येणार आहे.

शाळेत शिक्षकांनी शिकवताना व विद्यार्थ्यांनी शिकताना मास्क घालणे बंधनकारक आहे. ऑनलाईन शिक्षणात शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी, शंका-समाधान व नवा विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण विचारात घेऊन नववी ते बारावीपर्यत वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. १०) शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांवर शाळेत हजर राहण्यासाठी कोणतीही सक्ती नसून पालकांचे संमतीपञ घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा अशा सूचना शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.

यंदा परीक्षा उशिराने

करोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा राज्य शिक्षण मंडळ व शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेण्यात येणार अाहेत. परिस्थिती पाहता यंदा परीक्षा उशिराने होतील. भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच मे महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा होऊ शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या