घरासाठी पीएफमधील ९० टक्के निधी

सभासदांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार

0
सातपूर | दि.७ प्रतिनिधी- भविष्य निर्वाह निधीधारकांना स्वस्तात घर खरेदी करता यावे यासाठी ९० टक्के निधी उपलब्ध करुन देण्याची ‘इपीएफओ हाऊसिंग स्किम’ही योजना सादर करण्यात आली असून, त्या अन्वये सभासदांना आपल्या जमा निधीचा उपयोग घरासाठी फक्त एकदाच करता येणे शक्य आहे. त्याच्या परतफेडीबाबतही सोयीची योजना देण्यात आली असल्याचे कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने कामगारांना स्वस्तात घर उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने नवनवीन योजना आणण्यात आलेल्या आहेत. त्याअंतर्गतच भविष्य निर्वाह निधी विभागातर्फे ‘इपीएफओ हाऊसिंग स्किम’ आणलेली आहे. या योजनेद्वारे भविष्य निर्वाह निधी भरणार्‍या कोणत्याही कामगाराला त्याच्या जमा निधीच्या ९० टक्के रक्कम घरासाठी काढता येणे शक्य होणार आहे.

यासाठी मात्र किमान ३ वर्षे फंडाची रक्कम भरलेली असणे गरजेचे आहे. तसेच नोकरी कालावधीत केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी दहा सभासदांची कोणतीही सोसायटी नोंदणी करणे बंधनकारक असून, त्या माध्यमातून प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

खरेदी केलेल्या वास्तुची किंमत अथवा पीएफचे ९० टक्के रक्कम यातील कमीत कमी रक्कम काढता येणार आहे. घराचा व्यवहार फिसकटल्यास अथवा ताबा न मिळाल्यास सभासदाला संपूर्ण रक्कम १५ दिवसांत पीएफ कार्यालयात परत भरणे बंधनकारक राहणार आहे. ही संधी फक्त एकदाच घेता येणार आहे. पती-पत्नी दोघेही नोकरीस असल्यास दोघांच्या खात्यातील रकमेची मागणी करता येणार आहे. मात्र त्यासाठी दोघांचे संयुक्त करार असणे गरजेचे आहे.

या सुविधेचा लाभ घेणार्‍या सभासदांना पंतप्रधान आवास योजनेचाही लाभ घेता येणार आहे. त्यात आर्थिकदृष्ट्या मागासलेला वार्षिक ३ लाख उत्पन्न,वार्षिक ६ लाख उत्पन्न असलेले कमी उत्पन्न गट हे त्या ‘क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम’चा लाभ घेऊ शकतात.या सोबतच १८ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना पंतप्रधान आवास योजनेच्या ‘क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम’ योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सभासदांनी या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन भविष्य निर्वाह निधी कार्यलयातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*