Type to search

maharashtra जळगाव फिचर्स मुख्य बातम्या

कालीपिली-ट्रक अपघातात 9 ठार

Share

एरंडोल  – 

जळगावकडून एरंडोलकडे येणार्‍या कालीपिलीला भरधाव येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने कालीपिलीतील 9 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

या अपघातात एरंडोल येथील 5 जणांचा समावेश असल्यामुळे शहरात सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच मदतकार्यासाठी अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.

जळगाव येथून कालीपिली (एम एच 19, वाय 5207) ही प्रवासी घेऊन एरंडोलकडे येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील हॉटेल गौरीजवळ एरंडोलकडून जळगावकडे जाणार्‍या ट्रकच्या धडकेने भीषण अपघात झाला.

अपघातामुळे कालीपिली पलटी झाली. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात अनेक जण विव्हळत पडले होते. जखमींमध्ये नरेंद्र भिका कासार, तुळसाबाई संजय महाजन, यासीन खान पठाण, मिठाराम श्रावण, आर.के.सोईल शेख, राजू पुष्पाबाई

महाजन गिताबाई मधुकर देशमुख यांचा समावेश आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक अरुण हजारे एपीआय तुषार देवरे पोलीस कॉन्स्टेबल संदीप सातपुते निलेश ब्राह्मणकर अखिल मुजावर भाजपाचे उत्तर संघटन मंत्री महाराष्ट्र किशोर काळकर माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर नगरसेवक मनोज पाटील उपनगराध्यक्ष बबलू चौधरी माजी जि.प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले ,पराग पवार तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय महाजन, नगरसेवक अस्लम पिंजारी, अ‍ॅड. अहमद सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी परिश्रम घेतले. चौपदरीकरणाच्या संथ गतीने सुरु असलेल्या कामामुळे रोज अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहे मात्र तरीदेखील शासन कुंभकर्णी झोप घेत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे.

अपघातातील मृतांची नावे

प्रसन्ना निवृत्ती वंजारी (वय 10), निवृत्ती प्रभाकर वंजारी (वय 45 ), परमेश्वर नाना जाधव (वय 23)  नितीन (पिंटू) सोनार (कालीपिली चालक वय 42), काशिनाथ शंकर पाटील (वय 60), उज्ज्वला निवृत्ती वंजारी (वय 38), भानुदास माधव जाधव यांचा समावेश असून अपघातात दैव बलवत्तर म्हणून 6 वर्षाची बालिका सुखरूप बचावली आहे.

रुग्णवाहिकेचा दरवाजा ’लॉक’

जळगाव । या अपघातातील सात गंभीर जखमींना जळगावातील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णवाहिका (क्र.एमएच 19 सीएल 0543) चा दरवाजा जिल्हा रुग्णालयाजवळ आल्यानंतर लॉक झाल्याचे लक्षात आले.

प्रयत्न करुनही तो दरवाजा उघडत नव्हता. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात बांधकाम सुरू असल्याने तेथील लोखंड कापण्याच्या कटरने रुग्णवाहिकेचा दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. यात जवळपास एक तास गेला. याप्रसंगी रुग्णवाहिकेमधील रुग्ण भेदरले होते. जणू आतील रुग्णांच्या संयमाची

परीक्षा देव बघत होता. या अक्षम्य प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप व्यक्त होत होता. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात जखमींना आणल्यानंतर परिसरातील तरुणांनी तातडीने धाव घेत रुग्णालयात जखमींना नेण्यासाठी मदत कार्य केले. मन हेलावणारी दृश्ये पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत होते. या वेळी नागरिकांचीही मोठी गर्दी उसळली होती.

जळगावातही रुग्णांवर उपचार

जिल्हा रुग्णालयात सात रुग्णांना आणण्यात आले. यात जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील राजेंद्र आनंदा सोनवणे, विजय आनंदा सोनवणे, दूधभानसा खुसराम (वय 28), फुसियाबाई सुरेशकुमार (वय 50, रा.सोंधनी, धिंदवाडा, मध्यप्रदेश), मीठाबाई सखाराम आरके यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच गीताबाई रघुनाथ देशमुख व अनुसयाबाई (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना खासगी दवाखान्यात रवाना करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!