नाशकात ९२ मि.मी पाऊस

जिल्ह्यात दमदार हजेरी; नागरिकांची दाणादाण; घरे-दुकानांत शिरले पाणी

0
नाशिक | दि. १४ प्रतिनिधी- नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत झालेल्या धुव्वाधार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडवली. नाशिकला पावसाने झोडपून काढले. दीड तास झालेल्या पावसाने नाशिक तुंबले असून अनेक भागात घरे तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक आणि व्यावसायिकांची परवड झाली. नाशकात दोन तासांत ९२ मि.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

वणी, वडाळीभोई, मनमाड, निफाड, सटाणासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली. नाशिक परिसरात जोरदार पाऊस झाला. आज सकाळी सूर्यदर्शन झाल्याने पावसाची आशा नव्हती. मात्र सायंकाळी ४ च्या सुमारास अचानक आकाशात काळ्या मेघांनी गर्दी करत पावसाच्या आशा पल्लवित केल्या. सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या पावसाने शहरवासियांना फजिती केली.पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने काही क्षणातच शहरातील रस्ते सामसूम झाले. सायंकाळी घरी परतणार्‍या नोकरदारांचे पावसाने हाल झाले.

दरम्यान, उद्या गुरुवारी शाळा सुरू होणार असल्याने शहरातील शालेय बाजारपेठ ग्राहकांनी गजबजून गेली होती. पावसाच्या आगमनाने ग्राहकांचीही मोठी धांदल उडाली. काही क्षणातच बाजारपेठेत शांतता पसरली शहरातील अनेक चौकांत पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. शहरातील उंच भागातील पाणी वाहून येत असल्याने सराफ बाजारपेठेतील दुकानात पाणी शिरल्याने व्यावसायिकांची तारंबळ उडाली.

वडाळागाव, आनंदवली गाव, नागसेननगर भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट झाली. अनेकांच्या संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. पावसाचे आगमन होताच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नाशिककरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आजही त्याच प्रत्यय आला.

सायंकाळी सगळीकडे अंधार असताना वीज नसल्याने शहरवासियांना मेणबत्तीसह अन्य पर्यायांवर वेळ निभावून न्यावी लागली. वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसाने महात्मानगर, आयटीआय सिग्नल, डीजीपीनगर, राजीव गांधी भवन परिसर भागात वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नाशिक न्यायालय परिसरात वृक्ष पडल्याने एक बालक जखमी झाला.

सातपूर परिसरात बत्तीगूल
आजच्या मुसळधार पावसामुळे सातपूर औद्योगिक परिसरात सायंकाळी ५.३० पासून वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत बत्ती गुल होती. त्यामुळे महावितरण कंपनीच्या गलथानपणाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला

वाहतुकीचा खोळंबा
मुसळधार पाऊस व रस्त्यांवरील सखल भागात पाणी साचून रविवार कारंजा, अशोकस्तंभ, दहीपूल, शालिमार, सारडा सर्कल, त्रिंबक नाका, आईबीबी सर्कल, सिटी सेन्टर मॉल, कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरात वाहतूक कोंडी होऊन खोळंबा झाला.

LEAVE A REPLY

*