80 हजारच थकबाकीदार : नगर जिल्हा बँकेकडून 27 जूनपासून उचल देणे सुरू

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – रिझर्व्ह बँकेने जुन्या 500 आणि एक हजारांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा बँकेचा कोंडलेला श्‍वास मोकळा झाला आहे. यामुळे जिल्हा बँकेला दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार जून 2016 अखेर जिल्हा बँकेचे 80 हजार शेतकरी थकबाकीदार आहेत.

दहा हजारांच्या उचलीसाठी यातील थकबाकीदार शेतकर्‍यांनी घोषणापत्रानंतर सादर केल्यानंतर पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची आकडेवारी समोर येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली.27, 28 जूनपासून उचल देण्यास सुरूवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेच्या मासिक सभेनंतर गायकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष रामदास वाघ, संचालक आ. शिवाजीराव कर्डिले, उदय शेळके, अण्णासाहेब म्हस्के, पांडुरग अंभग, राजेंद्र नागवडे, जगन्नाथ राळेभात यांच्यासह जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे जिल्हा बँकेत पडून असलेल्या 168 कोटी नोटा बदलून मिळणार आहेत. यामुळे बँकेची आर्थिक कोंडी फुटणार असल्याने संचालक मंडळाने सरकारच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मांडला. तसेच लवकरात लवकर जिल्हा बँकेकडील जुन्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

राज्य सरकारच्या आदेशानुसार बँकेच्या संचालक मंडळाने शेतकर्‍यांना दहा हजारांची उचल देण्यास तत्वत्ता मान्यता दिली असल्याचे गायकर यांनी सांगितले. यासाठी जिल्ह्यातील सोसायट्यांना उचल देण्याचे निष्कर्षाच्या प्रती गुरूवारी तातडीने पाठवण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारच्या निकषानुसार जिल्ह्यात 30 जून 2016 अखेर थकबाकीदार शेतकर्‍यांची संख्या 80 हजार आहेत. हे थकबाकीदार शेतकरी यातून कोणत्या शेतकर्‍याकडे दहा लाखांच्या आत वाहन आहे. तो प्राप्तीकर भरतो की नाही, त्यांचे नातेवाईक सरकारी नोकरीचा फायदा घेत आहेत. याची माहिती जिल्हा बँकेकडे नाही.

मात्र, दहा हजारांच्या उचलीसाठी थकबाकीदार असणार्‍या शेतकर्‍यांना स्वयं घोषणापत्र द्यावयाचे आहे. त्यात घोषणापत्रानंतर 80 हजार थकबाकीदार शेतकर्‍यांतून दहा हजारांसाठी पात्र असणार्‍या शेतकर्‍यांचा आकडा समोर येणार आहे. पात्र असणार्‍या सर्व शेतकर्‍यांनी उचल घेतल्यास त्यासाठी 80 कोटी पर्यंतची रक्कमेची आवश्यकता लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गेल्यावर्षी बँकेने जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार शेतकर्‍यांना 1 हजार 117 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. दुष्काळी परिस्थिती असतांना जिल्हा बँकेची 82 टक्के वसुली झाली होती. मात्र, 31 मार्च 2017 पर्यंत बँकेने 650 कोटी रुपये वाटप केले असून वसुलीचे प्रमाण कमी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्य सरकारने 30 जून 2017 अखेरच्या शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली असती, तर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असता, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. सरकारने अद्याप दहा हजारांच्या उचलीसाठी किती व्याज आकारण्यात यावे, याचा खुलासा केलेला नाही. यामुळे बँक सध्या अल्प भूधारकांना आकारण्यात येणारे व्याज या उचलीवर आकारणार आहे.

व्याजपोटी 8 कोटींचा भुर्दंड –
गेल्या सहा महिन्यांत जुन्या पडून असणार्‍या 168 कोटींच्या नोटापोटी जिल्हा बँकेला जवळपास 8 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडे याबाबत मागणी करण्यात आलेली आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताच निर्णय नसल्याचे सांगण्यात आले. 

सरकारी चाळणीचा फटका अनेकांना बसणार – 
जून 2016 अखेर जिल्हा बँकेचे 80 हजार शेतकर्‍यांचे कर्जदार शेतकरी आहेत. यातील कोणाकडे वाहन आहेत, कोण प्राप्ती भरतो, कोणाचे नातेवाईक सरकारी पगाराचा लाभ घेतात. याचा तपशील बँकेकडे नाही. मात्र, कोण स्वयंघोषणा पत्रात याची माहिती लपवून दहा हजारांची उचल घेतल्यास त्याच्या विरोधात गावातील अन्य शेतकरी तक्रार करणार आहेत. यातून ग्रामीण भागात वादाचे विषय वाढणार आहे. सरकारी चाळणीचा फटका थकबाकीदार निम्म्या शेतकर्‍यांना बसण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*