मिश्र धातू उद्योगाची ८० एकरची मागणी

‘मेक इन नाशिक’चे फलित

0

नाशिक | दि. ३१ रवींद्र केडिया- निमाच्या व्हेंडर मिटच्या माध्यमातून शहरात दाखल झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांपैकी मिश्र धातू उद्योग लि.च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नाशिक परिसरात उद्योग उभारणीसाठी उत्सुकता दाखवली असून त्यासाठी ८० ते १०० एकर जागेची मागणी त्यांनी केली आहे.

निमातर्फे हॉटेल गेट वे येथे आयोजित कराण्यात आलेल्या ‘व्हेंडर डेव्हलपमेंट मिट’साठी देशभरातील ७ सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे (पीएसयू) वरिष्ठ पदाधिकारी शहरात दाखल झाले होते. दोन दिवस चाललेल्या या मिटमध्ये उद्योगांनी सुमारे १११ उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्याकडून उत्पादनांबाबत माहिती घेतली व त्यांच्या क्षमतांचा आढावा घेतला.

या ‘बी टू बी’ नंतर केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या मिश्र धातू उद्योगांच्या प्रतिनिधींनी खा. हेमंत गोडसे यांची भेट घेऊन उद्योग उभारणीसाठी पुढाकार घेत असल्याचे सांगितले व या भागात ८० एकर हून जास्त जागेची मागणी केली. यावेळी खा. गोडसे यांनी तातडीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांना पाचारण करून याबाबत मिश्र धातू कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली.

जिल्हाधिकार्‍यांनी याप्रश्‍नी दिंडोरी, सिन्नर, मालेगाव असे विविध पर्याय सादर केले. यासाठीच्या मागणीचा प्रस्ताव तातडीने पाठवून जागांची निवड करण्याची विनंती करतानाच सर्वतोपरीने सहकार्य करण्याचे आश्‍वासन कंपनी अधिकार्‍यांना दिले. पुढील भेटीत या प्रश्‍नावर ठोस निर्णय होणार असल्याचे सांगून खा. गोडसे यांनी याचा पाठपुराव करणार असल्याचे सांगितले.

मिश्र धातू उद्योग हे विविध धातूंच्या मिश्रणातून टणक पत्रा बनवतात. त्यांच्या या पत्र्याचा उपयोग अंतराळ यान, विमान निर्मिती, न्यूक्लियर पॉवर, केमिकल क्षेत्रांसाठी होत असल्याने या उद्योगासाठी लागणारे व्यावसायिक वातावरण नाशिक परिसरात असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. व्हेंडर मिटद्वारे नाशिक विभागातील उद्योगांची क्षमता लक्षात घेता मिश्र धातू उद्योग या परिसरात उभारण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे या अधिकार्‍यांनी बैठकीत ठामपणे सांगितले.

केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्र्रम मंत्री ना.अनंत गिते यांनी नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी व्हेंडर मिट च्या रुपाने दिलेला शब्द पाळला. विकासाच्या दिशेने आज खर्‍या अर्थाने वाटचाल सूरू होत असल्याने नाशिकचा विकास गतिमान होईल असा विश्‍वास वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहीलेल्या मेक इन इंडीयाला बळकटी देण्यासाठी मेक इन नाशिकचे यश मोलाची भर टाकणारे ठरेल असा विश्‍वास निर्माण झालेला आहे.
खा.हेमंत गोडसे

मेक इन नाशिक उपक्रमाच्या आयोजनातून परिसरातील उद्योगांचा विकास व्हावा हेच धोरण ठेवले होते. मोठे उद्योग आणण्यापूर्वी लघू व मध्यम उद्योगांचा विकास आपेक्षित होता यासाठी व्हेंडर डेव्हलपमेंटचे आयोजन केले होते. मिश्र धातू उद्योगाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी उद्योग उभारणीत उत्सूकता दाखवल्याने मेक इन नाशिकफ हा उपक्रम खर्‍या अर्थाने भरुन पावल्याचे समाधान होत आहे. दोन दिवसांच्या ङ्गव्हेंडर मीटफमुळे ११० उद्योगांमध्ये उत्साह संचारलेला असतानाच, या गूंतवणूकीच्या संकेताने मुळ उद्देश सफल होत असल्याचे समाधान आहे.
मंगेश पाटणकर (अध्यक्ष निमा)

LEAVE A REPLY

*