नाशिकमधून जायकवाडीला 8 टीएमसी पाणी; यंदा संघर्ष टळणार

0
नाशिक । जायकवाडीला पाणी सोडण्याच्या मुद्यावरून नेहमीच संघर्ष निर्माण होत आला आहे. दोन वर्षांपूर्वीही नाशिक जिल्ह्यात टंचाई असताना गंगापूरमधून जायकवाडीला पाणी देण्यात आल्याच्या मुद्यावरून पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे.

मात्र यंदा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणसाठ्यात वाढ झाल्याने धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे मराठवाडावासीयांची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. नाशिकमधून 1 जुलैपासून सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे आतापर्यंत जायकवाडीला 8 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

धरणातून पाणी सोडण्याच्या पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार सध्या गंगापूर, दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी नांदूरमध्यमेश्वरमधून पुढे जायकवाडीला जाऊन मिळते. त्यामुळे मराठवाडावासीयांना याचा मोठा लाभ होतो.

1 जुलैपासून आतापर्यंत जवळपास 8 हजार द.ल.घ.फू म्हणजेच 8 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जायकवाडीला पाणी सोडण्याची वेळ आली नाही.

मात्र गोदावरीला तीनवेळा आलेल्या पुरामुळे 65 टीएमसी म्हणजेच 65 हजार दलघफू इतके पाणी जायकवाडीला देण्यात आले. यंदाही या हंगामातील पहिल्याच पुरात जवळपास 8 टीएमसी पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून पुढे गेले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*