754 पालकांची 25 टक्के प्रवेशाकडे पाठ ; कागदपत्रांअभवी 132 पाल्यांचे प्रवेश नाकारले

0

नाशिक : शालेय शिक्षण विभागाने यंदा शैक्षणिक सत्राच्या अगोदरच वंचित घटकांच्या मुलांना खासगी शाळांच्या प्राथमिक पूर्व आणि प्राथमिक शाळेत प्रवेशासाठी प्रक्रिया राबवली. ऑनलाईन नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी लॉटरी निघूनही सुमारे 754 पालकांनी त्या शाळेत प्रवेश घेतले नाहीत. तर सुमारे 132 पाल्यांचे प्रवेश कागदपत्रांअभवी नाकारले आहेत.

जिल्ह्यातील 458 शाळांमध्ये नर्सरी आणि पहिलीच्या वर्गातील सहा हजारपेक्षा अधिक जागा 25 टक्के प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडे नोंदणी झाल्या होत्या. या जागांवर प्रवेश मिळवून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन पालकांना केले होते. त्यामुळे सुमारे 15000 मुलांची नोंदणी झाली होती.

लॉटरीच्या पहिल्या टप्प्यात 4 हजार 576 मुलांची खासगी शाळांत प्रवेश घेण्यासाठी निवड झाली होती. गत 20 मार्चपर्यंत पाल्यांचे प्रवेश त्यांनी निवडलेल्या शाळांमध्ये करून घेण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी केले होते. मात्र नुकताच आढावा घेतलेल्या आकडेवारीत 754 पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश नमूद शाळांमध्ये घेतला नाही. तर 132 मुलांचे प्रवेश कागदपत्रांची पूर्तता होत नाही म्हणून शाळांनी नाकारले आहेत. तर 142 मुलांचे प्रवेश प्रलंबित आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*