Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक : चालू वर्षात ७२९ रुग्ण एचआयव्ही बाधित; दोन लाख नागरिकांची स्क्रीनिंग...

नाशिक : चालू वर्षात ७२९ रुग्ण एचआयव्ही बाधित; दोन लाख नागरिकांची स्क्रीनिंग टेस्ट

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण वाढत असून चालू वर्षात जिल्ह्यात 729 रुग्ण एचआयव्हीबाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील सतराशे नोंदणीकृत वेश्यांपैकी 55 एचआयव्हीग्रस्त आहेत. तर पुरुषांमुळे गरोदर मातांना एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण 58 टक्के इतके आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात एचआयव्ही मोहिमेचा त्रैमासिक आढावा घेण्यात आला. एचआयव्हीचे स्क्रीनिंग योग्यप्रकारे करतानाच ट्रकचालक आणि वेश्या व्यवसायात असलेल्या महिलांची नियमितपणे तपासणी करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी दिल्या.

जिल्ह्यात चालू वर्षात 729 रुग्ण एचआयव्हीबाधित आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 1 एप्रिल 2019 ते 29 फेब्रुवारी 2020 या काळात आरोेग्य विभागाने 2 लाख 15 हजार नागरिकांची स्क्रीनिंग टेस्ट केली. त्यामध्ये 729 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांची नियमितपणे तपासणी केली जात असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. गरोदर मातांसह वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांची नियमित तपासणी केली जात आहे.

जिल्ह्यातील सतराशे नोंदणीकृत वेश्यांपैकी 55 एचआयव्हीग्रस्त असल्याचे सागर यांनी सांगितले. तर पुरुषांमुळे गरोदर मातांना लागण होण्याचे प्रमाण 58 टक्के आढळून आले आहे. तसेच वर्षभरात जिल्ह्यात रक्तदान शिबिरांमधून दोन लाखाहून अधिक रक्त पिशव्या उपलब्ध झाल्या.

त्यातील 42 पिशव्यांमधील रक्तात एचआयव्हीचे अंश आढळून आले. त्यामुळे रक्तदान करणार्‍या संबंधित नागरिकांना बोलावून घेत त्यांचे समुपदेशन करून योग्यप्रकारे उपचार केले जात असल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

पहिल्या दोन टप्प्यात एचआयव्ही रोगाचे निदान झाल्यास संबंधित रुग्णांना तातडीने उपचार देऊन त्यांचे आयुष्य वाढवता येऊ शकते, असे आरोग्य अधिकार्‍यांनी बैठकीत सांगितले. यावेळी बैठकीला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होतेे.

- Advertisment -

ताज्या बातम्या