72 रुग्णवाहिका चालकाविना

0

प्रशासनाने तातडीने भरती करावी : वाकचौरे

अकोले (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बहात्तर रुग्णवाहिका चालकाविना उभ्या आहेत खरं तर जिल्ह्यातील बराच भाग दूर्गम असून रुग्णांना सेवा मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकेसाठी खर्च झाला परंतु रुग्णांना मात्र त्याचा उपयोग होत नाही रुग्णांना ने आण करण्यासाठी रुग्णवाहिका आहे पण त्या चालवण्यास चालक नाहीत त्यामुळे त्या उभ्या आहेत.

रुग्णवाहिकेचा वापर झालाच तर तो कर्मचारी मिटींगसाठी होतो. तांत्रिक दृष्ट्या चालक कंत्राटी पद्धतीने घेतात परंतु आताच्या परिस्थितीत कोणीही कंत्राटी चालकाच्या निवीदा भरत नाहीत. त्यामुळे चालक मिळत नाही. त्यावर मार्ग काढून रुग्णांच्या सुविधेसाठी तातडीने चालक भरती करावी अशी मागणी भाजपचे प्रदेश सदस्य तथा जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे.

जिल्ह्यात 14 आरोग्य अधिकारी असतात परंतु अजूनही 8 आरोग्य अधिकार्‍यांच्या जागा रिक्त आहेत ही सुध्दा पदे जि.प.ने तातडीने भरायला हवीत. भरती प्रक्रीया महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असेल तर त्याचाही पाठपुरावा शासनाकडे तातडीने करायला हवा.जिल्ह्यात ग्रामीण भागाची लोकसंख्या 40 लाखाच्या आसपास असून त्यांना आरोग्य सेवा पुरविणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे.

परंतु जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचारी हजर नसतात. आलेच रुग्ण तर बरेच डॉक्टर, कर्मचारी, खाजगी डॉक्टर हॉस्पिटलला पाठवतात कट प्रॅक्टीस च्या नावाने आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होते. अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आदिवासी भागात आरोग्य विभागाची आणखी वाईट परिस्थिती आहे.

पेसा अंतर्गत डॉक्टर कर्मचारी निवासी राहायला हवेत परंतु आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कर्मचारी त्या गावात राहात नाहीत. त्यामुळे आदिवासी जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. आदिवासी भागात फिरते पथक नाही. कुपोषीत मुलांच्या तपासणीच्या सुविधा नाहीत. अतिवृष्टी झाली तर आणखी हाल येथील रुग्णांचे होतील.

अकोले तालुक्यात मूतखेल येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली पण ज्या जागेवर बांधली त्या जागा मालकाने सदर इमारतीला कुलूप लावून त्या इमारतीचा ताबा घेतला आता त्या गावात आरोग्याच्या कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. या सर्व विषयांची जिल्हा परिषदेने तातडीने दखल घ्यावी असे आवाहन श्री.वाकचौरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*