7/12 संगणकीकरणासाठी आता 1 ऑगस्टचा मुहूर्त

0

जळगाव / नागरीकांना संगणकीकृत 7/12 उतारा देण्यासाठी आता शासनाच्या आदेशानुसार 1 ऑगस्टचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे.

1 ऑगस्टपूर्वी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे 7/12 उतारा संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात आज महसूलमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिले.

संगणकीकृत 7/12 उतारासंदर्भात आज राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधला.

नागरीकांना संगणकीकृत 7/12 उतारा देण्यासाठी अगोदर 1 मे चा मुहूर्त ठरविण्यात आला होता.

मात्र सॉफ्टवेअर आणि इतर अडचणींमुळे हा मुहूर्त टळला. जिल्ह्यात संगणकीकृत 7/12 उतार्‍याचे काम हे 75 टक्के झाले आहे.

उर्वरित काम प्रगतीपथावर असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. नागरीकांना संगणकीकृत 7/12 उतारा देण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार 1 ऑगस्टचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे.

त्यासाठी कालबध्द कार्यक्रम देखील शासनाकडून आखून देण्यात आला आहे.

तीन टप्प्यात होणार काम
शासनाने आखून दिलेल्या कालबध्द कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यामध्ये खातेदारांच्या 7/12 उतार्‍याची ऑनलाईन तपासणी केली जाणार आहे.

दुसर्‍या टप्प्यात दि.16 मे ते 15 जून या कालावधीत चावडी वाचन करुन उतार्‍यावरील चुकांची दुरुस्ती पूर्ण करण्याची कार्यवाही करावयाची आहे.

दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर तिसर्‍या टप्प्यात महसूल अधिकार्‍याने 7/12 उतार्‍यांची अंतीम अचूक तपासणी करावयाची आहे.

दि.1 ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत.

चूका आढळल्यास अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई
चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेनंतरही 7/12 उतार्‍यामध्ये त्रुटी अथवा चूका आढळून आल्यास त्याची गंभीर दखल घेवून संबंधित अधिकारी किंवा कर्मचार्‍यावर जबाबदारी निश्चित करुन शिस्तभंगाची कार्यवाही केली जाणार आहे.

अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच दुरुस्तीचे काम
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांमार्फत संगणकीकृत 7/12 उतार्‍यांचे घरोघरी जावून दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचनाही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*