Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

न्यूझीलंडमधील गोळीबारात सात भारतीयांचा मृत्यू

Share
ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींमध्ये झालेल्या भीषण नरसंहारामध्ये सात भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  मृतांमध्ये हैदराबादमधील दोन, केरळाची एक महिला आणि गुजरातमधील चार व्यक्तींचा समावेश आहे. अन्य तीन जण भारतीय वंशाचे  असून त्यापैकी दोन गुजरात आणि एक तेलगंनातील आहेत. शुक्रवारी न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील मशिदींमध्ये गोळीबारातील मृत्यूचा आकडा ५० वर गेला आहे. तर एकूण ४८ जण जखमी आहेत.

हैदराबादच्या राहणाऱ्या फरहाज हसन आणि मुसा वली सुलेमान पटेल यांचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. फरहाज हे सात वर्षांपासून न्यूझीलंडमध्ये काम करत होते. ते व्यवसायाने अभियंता होते. मुसा वली पटेल यांचे भाऊ हाजी अली पटेल यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील राहणाऱ्या २५ वर्षीय अंशी अलीबावा या महिलेचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. अंशी आपल्या पतीबरोबर मशिदीत गेली होती. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली.

या हल्ल्यात गुजरातमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात पिता-पुत्रांनाही आपला जीव गमावावा लागला आहे. यामध्ये भारुचमधील एनआरआय, नवसारीमधील एका व्यक्तीसह वडोदराच्या पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. वडोदरामधील आरिफ वोहरा आणि त्यांचा पुत्र रमीज वोहरा मशिदींवरील दहशतवादी हल्ल्यानंतर बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शनिवारी, त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय नवसारीमधील जुनेद युसुफ कारा आणि भरुचमधील हाफेज मूसा वली यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

न्यूझीलंडमधील दोन मशिदीत शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर हल्ला झाला. यानंतर हल्लेखोर ब्रेन्टॉन हॅरीसन टॅरॅन्टला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्‍यान, न्यूझीलंडच्या इतिहासातील हा सर्वांत काळा दिवस आहे, अशा शब्दांत व्यथित झालेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!