Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

निर्यातप्रश्नी आजपासून कांदा सत्याग्रह

Share

  शेतकरी संघटनेचा आरोप : निवडणुका आल्या की शेतकर्‍यांचा बळी

अहमदनगर (प्रतिनिधी)-  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे सरकारने कांद्याची बंद केलेली निर्यात पुन्हा खुली करून त्यावरील निर्बंध हटवावेत. सरकार कोणाचेही असो निवडणूक आल्या की शेतकर्‍यांचा बळी दिला जातो. आता ही प्रथा बंद झाली पाहिजे. शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेल्या केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत सोमवारपासून शेतकरी संघटनेने कांदा सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

रविवारी नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत घनवट बोलत होते. ते म्हणाले, दोन-चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली जगत आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. मात्र, असे असताना भाजप सरकारने शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केले. शेतमालाला हमी भाव दिला नाही. यंदा कांदा पिकाला चांगला बाजार मिळत असताना शेतकरी विरोधी सरकारने निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करणे आवश्यक झाले आहे. निर्यात बंदी हटविण्यात यावी, यासाठी शेतकरी संघटना राज्यात दोन टप्प्यांत कांदा सत्याग्रह आंदोलन करणार आहे.

कांदा निर्यात बंदी व साठ्यावरील मर्यादा घातल्यामुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांना कांदा खरेदी करणेही अशक्य झाले. कांदा खरेदी करणार्‍या घाऊक व्यापार्‍याला पाचशे क्विंटलची मर्यादा घालणे म्हणजे कांदा पिकाचा व्यापाराचा अभ्यास नसल्याचे लक्षण आहे. सरकारने शेतकर्‍याला दोन रुपये किलोप्रमाणे अनुदान देऊ केले होते, ते अद्यापही अनेक शेतकर्‍यांना मिळाले नाही. उत्तर भारतात कांदा पाठवला त्यावर निर्बंध घातल्याने व्यापारी अडचणीत आला आहे. शेतकर्‍यांवर होत असलेला अन्याय यापुढे शेतकरी संघटना सहन करणार नाही. सरकारने कांदा निर्बंध हटवायचे आश्वासन दिले तरच आंदोलन मागे घेऊ, अन्यथा कांदा सत्याग्रह आंदोलन होणारच असे घनवट यांनी यावेळी स्पष्ट केले. या आंदोलनात शेतकर्‍यांसह व्यापारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आंदोलनाचे स्वरूप
कांदा सत्याग्रह आंदोलनात व्यापांर्‍याकडून कांदा खरेदी बंद असणार आहे. परंतु, किरकोळ बाजारात शेतकरी आपला कांदा विक्री करू शकतो. ग्राहकांना वेठीस ठरण्याचा उद्देश शेतकरी संघटनेचा नाही. शेतकरी घाऊक बाजारात कांदा विक्रीला आणणार नाही. व्यापारी संघटना आंदोलनात सहभागी असणार आहे. सर्वांनी शेतकरी हितासाठी सहकार्य करून आंदोलन यशस्वी करण्यासाठी मदत करावी असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष घनवट यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!