66 हजार शेतकर्‍यांनी भरली 22 कोटींची थकबाकी

0

कृषी संजीवनी योजना : आता अवघ्या आठवड्याची मुदत 

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सुमारे 65 हजार शेतकर्‍यांनी महावितरणची थकीत वीजबिलापोटी 22 कोटींची थकबाकी भरली आहे. वीजबिल थकबाकी असणार्‍या 2 लाख 30 हजार कृषिपंप ग्राहकांनी अद्यापही त्यांचे चालू वीजबिल भरलेले नाही, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. अधिकाधिक शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक परिमंडलातंर्गत येणार्‍या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 6 लाख 62 हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास 3 हजार 468 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

यात जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार शेतकर्‍यांकडे वीजबिलाची 2285 कोटी रुपये एकूण तर दंड व व्याजाची रक्कम वगळता 1338 कोटी रुपये मूळ रक्कम थकीत आहे. योजना जाहीर होण्यापूर्वी कृषिपंपाचे वीजजोड तोडण्याची मोहिम ऑक्टोबर-2017 अखेर हाती घेण्यात आली होती. तेंव्हापासून 21 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील 65 हजार 329 शेतकर्‍यांनी 22 कोटी 46 लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा महावितरणकडे केला आहे.

कृषी संजीवनी योजनेतून कृषिपंप ग्राहकांना थकीत बिलावरील व्याज व दंड यात शंभर टक्के सवलत मिळणार असून केवळ मूळ थकबाकी भरावयाची आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग घेतल्यास तब्बल 947 कोटी रुपयांची सवलत मिळू शकणार आहे.

योजनेनुसार 30 हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास मूळ थकबाकीचे पाच सामान हप्ते करून ते दर तीन महिन्यांनी चालू बिलासोबत तर 30 हजारपेक्षा अधिकची थकबाकी असल्यास मूळ थकीत रकमेचे दहा समान हप्ते दर दीड महिन्यांनी चालू बिलासह भरावे लागणार आहेत. डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या एक वर्षाच्या कालावधीत हप्ते भरून थकबाकीमुक्त होण्याची संधी या योजनेने सर्व शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता कुमठेकर, नगर मंडलाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी केले आहे.

वीज जोडणी घेतल्यानंतर एकदाही वीजबीलाची रक्कम न भरलेल्या जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांची संख्या 65 हजार 696 इतकी आहे. तर दुसरीकडे महावितरणने गेल्या तीन वर्षात 1 लाख 1043 कृषिपंप ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिली आहे. गेल्या दोन वर्षात एकदाही वीजबिल न भरणार्‍या कृषिपंप ग्राहकांची संख्या 3 लाख 55 हजारपेक्षा जास्त आहे. त्यामुळे महावितरणला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

30 नोव्हेंबरच्या आत बिल भरा ःकुमठेकर
थकबाकीदार ग्राहकांनी 30 नोव्हेंबरच्या आत त्यांचे चालू वीजबिल भरून मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी व्हावे घेऊन सवलतीचा लाभ मिळवावा, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*