गोल्फ क्लबवर मनपा उभारणार 60 फुटी वॉच टॉवर; ऐतिहासिक वास्तु म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न

0
नाशिक । शहरातील मेनरोड येथील नगरपालिका कार्यालयावरील वॉच टॉवरची सुमारे 60 फुटी उंंंच प्रतिकृती ही शासकीय विश्रामगृहालगत असलेल्या गोल्फ क्लब मैदानातील कै. अनंत कान्हेरे मैदानातील स्टेडियम गॅलरीवर उभारण्यात येणार आहे. ऐतिहासिक वास्तु म्हणून ओळख निर्माण व्हावी, अशी डिझाईन या वॉच टॉवरची तयार केली जाणार असून यासंदर्भात प्रस्ताव लवकरच महासभेवर येणार आहे.

नाशिक शहरात मेनरोड भागात ब्रिटिशकालीन लोकल बोर्डाची वास्तु आता महापालिका विभागीय कार्यालय म्हणून वापरले जात आहे. या शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या ऐतिहासिक वास्तुवर वॉच टॉवर बसवण्यात आले आहे. याची ओळख जिल्ह्यातील नागरिकांना आहे. मात्र नंतरच्या काळात या महापालिकेच्या कार्यालयाच्या आजूबाजूला त्यापेक्षा उंची इमारती झाल्याने आता दूरवरुन वॉच टॉवर दिसेनासा झाला आहे.

याच ऐतिहासिक वास्तुवरील वॉच टॉवरची जपवणूक करण्यासाठी यांचीच प्रतिकृती मागील पंचवार्षिक काळात माजी महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी अनंत कान्हेरे मैदानावर बसवण्याचे नियोजन केले होते. त्याकरिता माजी नगरसेविका सुजाता डेरे यांनी प्रस्ताव देखील दिला होता.

मात्र नंतरच्या काळात निधीच्या कारणावरुन हा प्रस्ताव बाजूला पडला होता. आता मात्र प्रशासनाकडून पुन्हा वॉच टॉवर उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर पश्चिम प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी आपल्या विशेष निधीतून तरतूद करण्यास सहमती दिली आहे.

त्यामुळे आता पुन्हा एकदा बांधकाम विभागाने आता नव्याने प्रस्ताव तयार करण्यास प्रारंभ केला आहे. याकरिता अंदाजे 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने आता प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच महासभेवर येणार आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर या कामासंदर्भात ई- निवीदा काढून हे काम केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

*