Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पुरामुळे जिल्ह्यात 59 कोटींचा फटका

Share

अहमदनगर(प्रतिनिधी)- गेल्या 10 ते 15 दिवसांत नाशिक आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यातील धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. यामुळे गोदावरी आणि भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. पुराच्या पाण्यामुळे नगर जिल्ह्यातील नदी काठावरील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा, श्रीगोंदा आणि कर्जत या सहा तालुक्यांतील 3 हजार 540 नागरिकांना निवारा कॅम्पमध्ये हलविण्यात आले होते. यासह 58 कोटी 85 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

जिल्हा टंचाई निवारण आणि आपत्ती कक्षाने याबाबतच अहवाल तयार करून तो सोमवारी राज्य सरकारला सादर केला आहे. गेल्या 10 ते 15 दिवसांत नाशिक आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रामणात पाणी सोडण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा फटका जिल्ह्यातील गोदा काठावरील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील गावांना बसला आहे. तर पुणे जिल्ह्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा फटका श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील काही गावांना बसला आहे.

गोदावरी आणि भिमा नदीच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 27 हजार 411 वरील पिके वाहून गेली असल्याचे कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. यामुळे शेतकर्‍यांचे 26 कोटी 27 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोपरगाव, राहाता, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यातील 3 हजार 540 नागरिकांना 24 निवारा कॅम्पमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. यासह 521 घरांचे नुकसान झाले असून 5 जनावरे आणि कोपरगावात एक मनुष्यहानी झाली आहे. संबंधीत मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दगावलेली जनावरे
4 मोठी
1 शेळी
मनुष्यहानी
कोपरगाव – 1

नागरिकांचे स्थलांतर
तालुकानिहाय आकडेवारी- कोपरगाव (15 कॅम्प) 663 स्थलांतर, श्रीरामपूर (4 कॅम्प) 186 स्थलांतर, नेवासा (3 कॅम्प) 1350 स्थलांतर, राहाता (2 कॅम्प) 1341 स्थलांतर.

घरांची पडझड
कच्ची घरे
75
पक्की घरे
427
झोपड्या
21

जिल्ह्यात गोदा आणि भिमा नदीच्या पुरामुळे 26 कोटी 27 लाख रुपयाचेे शेती आणि पिकांचे नुकसान झाले असून उर्वरित घरे, रस्ते, पुल खचणे यासह अन्य प्रकारातील 32 कोटी 58 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!