Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पोस्ट पेमेंट बँकेत वर्षभरात ५२ हजार बचत खाती 

Share

नाशिकसह मालेगाव विभागातील ६५० पोस्ट कार्यालयांत मिळते बँकिंग सेवा 

अजित देसाई । नाशिक 
भारतीय टपाल खात्याने वर्षभरापूर्वी सुरु केलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) ने नाशिक व मालेगाव विभागात असणाऱ्या सुमारे ६५० पोस्ट कार्यालयांच्या माध्यमातून ५२ हजार झिरो बॅलन्स बचत खाती उघडण्यात आली असून त्याद्वारे खातेदारांना बँकिंग सुविधांसह पोस्टाच्या ऑफलाईन असणाऱ्या आर्थिक सुविधांचा एकत्रित लाभ देण्यात येत आहेत. वर्षभरात उघडण्यात आलेल्या या बचत खात्यांद्वारे सव्वातीन कोटी रुपये रक्कम जमा असून विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला या उपक्रमाचा प्राधान्याने लाभ मिळतो आहे.
देशात ग्रामीण भागात बँकांचे जाळे प्रभावी नसल्याने डिजिटल इंडिया मिशनला अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी दि.१ सप्टेंबर रोजी टपाल विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची स्थापना केली. देशातील दिड लाख पोस्ट कार्यालयांपैकी सुमारे सव्वा लाख पोस्ट कार्यालयांमार्फत ही सेवा सुरु करण्यात आली असून त्यामुळे पोस्ट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक ठरली आहे. प्रत्येक जिल्हा स्तरावर असलेल्या प्रधान डाक घर च्या धर्तीवरच या बँकेच्या शाखांचे नियोजन करण्यात आले आहे. उप डाकघर, शाखा डाकघर याप्रमाणे बँकेची शाखा कार्यान्वित करण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्हा किंवा विभाग स्तरावर बँकेची प्रधान शाखा असून देशात अशा ६५० प्रधान शाखा आहेत. तर राज्यात ही संख्या ४० इतकी आहे. नाशिकचा विचार करता नाशिक व मालेगाव या दोन विभागात असणाऱ्या ६५० पोस्ट कार्यालयांमध्ये आयपीपीबी ची सेवा पुरवली जात आहे.
 पोस्ट कार्यालयात पूर्वीपासून आरडी, सुकन्या, पीपीएफ सारख्या सेवा पुरवल्या जात आहेत. मात्र या सेवा ऑफलाईन असल्याने या खात्यावर पैसे भरण्यासाठी अथवा काढण्यासाठी समक्ष यावे लागायचे मात्र आता बँकिंग सेवेमुळे या ऑफलाईन सेवा इंटरलिंक करण्यात आल्या असून पोस्ट  व पोस्ट बँकेचे व्यवहार एकत्र करणे शक्य झाले आहे. याशिवाय पोस्ट बँकेच्या माध्यमातून इतर बँकांशी आरटीजीएस, एनएफटी सारखे डिजिटल पेमेंट करणे  देखील शक्य झाले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, कृषी सन्मान, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासनाच्या स्कॉलरशिपचा लाभदेखील डीबीटी प्रणालीद्वारे पोस्ट बँकेच्या खातेदारांना दिला जात आहे.
खाते उघडणे सोपे 
पोस्ट बँकेत बचत खात्यासोबतच व्यक्तिगत नावाने करंट (चालू) खाते देखील उघडता येते. यासाठी केवळ आधार क्रमांक व मोबाईल फोन जवळ असणे आवश्यक आहे. या बँकेचा उद्देश आर्थिक व्यवहार डिजिटली पद्धतीने व्हावेत ह्या असल्याने खातेदारांना चेकपुस्तक देण्यात येत नाही. मागणीनुसार केवळ करंट खातेधारकांनाच ही सुविधा मिळते.
खाते उघडणाऱ्या ग्राहकाला क्यू आर कार्ड देण्यात येते. या कार्डच्या सहाय्याने बँकिंग सेवा असणाऱ्या देशातील कोणत्याही पोस्ट कार्यालयात जाऊन ग्राहकांना आर्थिक व्यवहार सुलभतेने करता येतात. पोस्ट बँकेने स्वतःचे स्वतःचे मोबाईल अप्लिकेशन देखील सुरु केले असून त्याद्वारे घरबसल्या ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणे प्रत्येकाला शक्य झाले आहे. या बँकेत वयाची १० वर्षे पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती स्वतःच्या नावाने खाते उघडून त्याद्वारे बचतीचा स्वतंत्रपणे व्यवहार करू शकते.
विद्यार्थ्यांसाठी शिबिरे 
पोस्ट बँकेमार्फत शालेय विदयार्थी व शासकीय योजनेच्या लाभार्थीना खाते उघडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी शाळा व गावपातळीवर आगामी काळात शिबिरे घेतली जाणार आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात १०५ सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे बचत खाते उघडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.  समाजकल्याण विभागाकडून देखील त्यांच्या अखत्यारीतील योजनांच्या लाभासाठी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पोस्ट बँकेत खाती उघडावीत म्हणूनआवाहन करण्यात आले असल्याची माहिती बँकेच्या नाशिक शाखेचे वरिष्ठ प्रबंधक राजेंद्र आघाव यांनी दिली.
आधार संलग्न पेमेंट सुविधा 
वर्षपूर्ती निमित्त आयपीपीबीने आधार संलग्न भुगतान सेवा अर्थात एईपीएस या योजनेची घोषणा केली आहे.  दि. १ सप्टेंबर पासून पोस्ट बँकेत खाते नसणारांसाठी देखील आधार लिंक असणाऱ्या  त्यांच्या इतर बँक खात्यावरून पैसे काढता येणार असल्याची माहिती नाशिक विभागाचे वरिष्ठ प्रवर अधीक्षक आर.डी.तायडे यांनी दिली. या सेवेद्वारे कोणत्याही पोस्ट बँक शाखेतून आधार पडताळणी करून १० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधित खात्यावर तेवढी रक्कम असणे आवश्यक आहे. ही सुविधा ज्या भागात एटीएम नाही अशा ठिकाणी अधिक फायदेशीर ठरणार आहे.
सध्यातरी ही सेवा निःशुल्क असणार आहे. म्हणजेच पोस्टाकडून यासाठी कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क घेतले जाणार नाही. मात्र ज्या बँकेच्या खात्यावरून व्यवहार करण्यात आला ती बँक त्यांच्या नियमानुसार यासाठी शुल्क आकारू शकते. (उदा. एसबीआयच्या ग्राहकांसाठी महिन्याला कुठूनही पैसे काढले तर ४ ट्रान्झेक्शन मोफत असून त्यापुढील प्रत्येक ट्रान्झेक्शनसाठी ठराविक शुल्क आकारते.). देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात केवळ आधार पडताळणीच्या सहाय्याने तातडीच्या वेळी या योजनेमुळे बँक खात्यावरील रक्कम काढणे शक्य होणार आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!