पाच वर्षांनंतर तमाशा संपणार

0

तमाशा कलावंत पोपट बडे, नंदाराणी नगरकर यांची खंत

कोळपेवाडी (वार्ताहर) – एकेकाळी या राज्यात नावाजलेले जवळपास 25 लोकनाट्य तमाशाचे फड होते. परंतु प्रगत तंत्रज्ञानामुळे मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेट घराघरात जाऊन पोहोचलले आहे. शासनाकडून तमाशा कलावंतांना मदत मिळत नाही त्यामुळे तमाशा कलावंताची उपेक्षा होत आहे. दिवसेंदिवस तमाशाचे रसिकही कमी होत असून लोकनाट्य तमाशाला उतरली कळा लागली आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतर तमाशा संपणार अशी खंत ज्येष्ठ तमाशा कलावंत हरिभाऊ बडे नगरकर यांचे चिरंजीव पोपट बडे व हरिभाऊ बडे यांची नात उत्कृष्ट महिला ढोलकीवादक शिवकन्या बडे यांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागातील यात्रा महोत्सव व तमाशा हे समीकरण फार पूर्वीपासून चालत आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना यात्रेच्या निमित्ताने मनोरंजनाचा विरंगुळा व वगनाट्याच्या माध्यमातून कौंटुंबिक व सामाजिक विषयांना वाचा फोडून मनोरंजना बरोबर समाज प्रबोधनाचे काम लोकनाट्य तमाशा कलावंत करीत होते. पण आज या लोककलेला उतरली कळा लागली असून कित्येक तमाशा फड मालकांनी खर्च पेलवत नसल्यामुळे तमाशा फड बंद केले आहेत. आजमितीला फक्त 9 तमाशाचे फड सुरु असून हे तमाशा फडही जास्त दिवस तग धरू शकणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गुढीपाडव्याला महेश्वर महाराज यात्रोत्सव भरतो.

कोळपेवाडी ग्रामस्थांनी यात्रेकरू व तमाशा रसिकांच्या मनोरंजनासाठी सालाबादप्रमाणे याहीवर्षी हरिभाऊ बडे सह नंदाराणी नगरकर यांचा लोकनाट्य तमाशाचे मोफत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याशी केलेल्या संवादातून ही लोककला संपुष्टात येणार असल्याची उद्ग्नित्ता समोर आली आहे.

यावेळी पोपट बडे व नंदाराणी नगरकर यांनी तमाशा व्यवसायातील अडचणींचा पाढाच वाचून दाखवला. मी ज्येष्ठ तमाशा कलावंत हरिभाऊ बडे यांच्या पाचव्या पिढीच्या रुपात तमाशा कला जोपासत आहे. कोळपेवाडीच्या तमाशा रसिकांचे व ग्रामस्थांची मिळणारी प्रेमाची वागणूक व तमाशा कलेची कदर प्रत्येक गावात होईल याची शाश्वती नसते. तरीही 100 महिला, पुरुषांच्या हाताला रोजगार व त्यांच्या कलेला वाव मिळावा यातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार मिळावा यासाठी गावोगावी मिळणार्‍या चांगल्या वाईट अनुभवांना सोबत घेऊन ही लोककला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. कलाकारांना तमाशा सिझन सुरु होण्यापूर्वी एक लाखाच्या वर उचल द्यावी लागते. उत्पनांचे शाश्वत स्त्रोत नाही.

कर्जासाठी बँका जवळ करत नाही. अशावेळी खाजगी सावकाराकडून पाच रुपये शेकडा दराने कर्ज काढावे लागते. 87 वर्ष वय असलेले वडील हरिभाऊ बडे पक्षाघात आजाराने अंथरुणाला पडून आहेत. त्यांना दरमहा 1 हजार 500 रुपये पेन्शन मिळते. शासनाने या पेन्शनच्या रकमेत वाढ करून 60 वर्षानंतर दिली जाणार पेन्शन तमाशाची सद्याची परिस्थिती बघता वयाच्या 50 वर्षानंतर दिल्यास कलाकारांना आधार मिळू शकतो. एक काळ असा होतो की, तमाशाकडे कला म्हणून पाहिले जायचे पण आता तशी परिस्थिती नाही. राज्याच्या काही भागात गेल्यास महिला कलावंतांना रंगमंचावरच खडे मारले जातात.

काही ठिकाणी पोलिसांकडून तमाशाच्या तिकिटांची विक्री झाली अथवा न झाली तरी सुरक्षेच्या नावाखाली हजारो रुपयांची मागणी होते. आमची सुरक्षेसाठी पैसे द्यायला ना नाही परंतु ठराविक रक्कम शासनाने ठरवून दिली पाहिजे व त्या रकमेची रीतसर पावती मिळाली पाहिजे. सांगली, सातारा या भागात आजही तमाशातील महिला कलावंतांचा साडी चोळी देऊन सत्कार केला जातो. त्यामुळे ही कला जिवंत ठेवण्यासाठी ऊर्जा मिळते. भविष्यात सरकारने तमाशा कलावंतांची दखल घेतल्यास ही लोककला जोपासली जाऊ शकते अन्यथा भविष्यात पाच वर्षानंतर तमाशा बंद पडणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे पोपट बडे व शिवकन्या बडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*