Tuesday, April 23, 2024
Homeधुळेराज्यातील पहिला प्रयोग : कोरोनाविरोधात लढ्यासाठी धुळे कारागृहाचे 5 सूत्र

राज्यातील पहिला प्रयोग : कोरोनाविरोधात लढ्यासाठी धुळे कारागृहाचे 5 सूत्र

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयीन कामकाज, आहारात बदल, बराकीही केल्या स्वच्छ

धुळे – 

- Advertisement -

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे धुळे कारागृहाने अनेक बदल केले आहेत. स्वच्छता, आहार, तंत्रज्ञान, खबरदारी, प्रबोधन असे पाच सूत्र वापरुन काम केले जात आहे. कारागृहात सोमवारपासून व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या (व्हिसी) माध्यमातून न्यायालयीन कामकाज सुरु करुन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

तसेच नवीन येणार्‍या बंदीवानांची तपासणी करुन ते ‘निगेटीव्ह’ असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याची खबरदारी घेण्यात आली. संपूर्ण कारागृह परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
धुळे कारागृहाच्या अधीक्षिका दीपा आगे यांनी कोरोनापासून सावधगिरीच्या दृष्टीने तयारी केली आहे.

न्यायालयाला पत्र देवून व्हीसीच्या माध्यमातून कामकाज करण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केली. त्यामुळे सोमवारपासून प्रत्यक्षात कामकाज व्हिसीने सुरु झाले. त्यासाठी चार युनिट कार्यरत आहेत.

कारागृहातच स्वतंत्र वॉर्ड

कारागृहाच्या आवारातच कोरोनासाठी वॉर्ड सज्ज करण्यात आले आहेत. यात पुरुषांसाठी दहा तर महिलांसाठी दोन वॉर्डचा समावेश आहे. कारागृहातील डॉक्टर शिवाजी जायभाये हे याबाबत नियंत्रण ठेवून आहेत.

प्रबोधन व स्वच्छता

दोन दिवसांपूर्वीच कारागृहातील बंदीवानांसाठी प्रबोधन वर्ग घेण्यात आले. यात डॉ.जायभाये यांच्यासह अधीक्षिका दीपा आगे यांनी मार्गदर्शन केले. कारागृहा बाहेर आणि आत असे तीन ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली असून डेटॉल, नॅपकीनसह सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच काल रविवारी कारागृहातील सर्व बाराकी स्वच्छ करण्यात येवून कपडे व बिछानेही धुवून स्वच्छ करण्यात आले आहेत.

पोलीस प्रशासनालाही पत्र

पोलीस अधीक्षकांना व हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील अधीष्ठातांना कारागृहामार्फत पत्र देण्यात आले आहे. कारागृहात येणार्‍या नव्या बंदीवानांची पूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या प्रमाणपत्रावर कोरोना ‘निगेटीव्ह’ असल्याचा स्पष्ट उल्लेख असावा. त्याशिवाय त्यांना कारागृहात प्रवेश दिला जाणार नाही असे सूचित करण्यात आले आहे.

आहारात बदल

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. कारागृहात सध्यस्थितीत 350 बंदीवानांचा समावेश आहे. तर किमान 30 महिला बंदीवान आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पूर्णपणे खबरदारी घेण्यात येत आहे. कालपासून आहारातही बदल करण्यात आला असून आज त्यांना बाजरीची भाकरी, बीटस्, मटकी, भात असे पौष्टीक खाद्य देण्यात आले.

विशेष म्हणजे बंदीवान महिलांनी स्वतः या भाकरी तयार केल्यात. त्यांच्यात सहयोगाची भावना वाढावी असाही त्यामागील उद्देश होता.

कारागृहातील 350 हून अधिक बंदीवान आणि 150 पेक्षा अधिक कर्मचार्‍यांचा सहभाग आहे. प्रवेशद्वारापासून 1 कि.मी.पेक्षा जास्त कारागृहाचा परिसर आहे. यात प्रवेश करण्या पासून ते बंदीवानांच्या बराकींपर्यंत तीन वेगवेगळ्या ठिकाणी हात स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या