पाच सख्खेे दरोडेखोर भाऊ जेरबंद

0

दोन जिल्ह्यांत 51 गुन्हे दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)– श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील सख्ख्या पाच भावांना विसापूर परिसरात दरोड्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.16) रात्री करण्यात आली असून त्यांच्याकडून सुरे, कोयता, लाकडी दांडे, दोरी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक केलेल्या सहा आरोपींवर पुणे ग्रामीण व नगर जिल्ह्यांत गंभीर स्वरुपाचे 51 गुन्हे दाखल आहेत.

बुधवारी रात्री एलसीबीची गस्त सुरू असताना काही दरोडेखोर हे रस्तालूट करण्यासाठी विसापूर ते बेलवंडी रोडवर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे कैलास देशमाने, श्रीधर गुट्टे या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचे पथक तयार करुन विसापूर परिसरात सापळा रचला. ठरल्या वेळी संशयीत व्यक्तींची टोळी समोरुन आली.

त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर झडप मारली. यात सगड्या उंबर्‍या काळे, कुक्या उर्फ सुलदास उंबर्‍या काळे, अक्षय उंबर्‍या काळे, कोक्या उर्फ कुलदास उंबर्‍या काळे, मिथून उंबर्‍या काळे (रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा), दत्ता अरुण उर्फ आर्‍या भोसले (रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा) अशी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. मात्र, सहा जणांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात सुरे, कोयता, लाकडी दांडे, दोरी असा दरोडा टाकण्यासाठी आवश्यक असणारा मुद्देमाल मिळून आला. यात पाच दरोडेखोर हे सख्खे भाऊ असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तर एक त्यांच्याच जवळचा नातलग आहे. या सर्व दरोडेखोरांवर श्रींगोंदा पोलीस ठाण्यात 399 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत दरोडेखोरी
आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर बलात्कार, दरोडे, फसवणूक, रस्तालूट, खून, घरात घुसून मारहाण, चोर्‍या असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच कोतवाली, नगर तालुका, पारनेर, बेलवंडी, सुपा, श्रीगोंदा, आळेफाटा, मंचर अशा वेगवेगळ्या ठिकाणी 51 गुन्हे दाखल आहेत. या आरोपींचे पालक देखील सराईत गुन्हेगार असून त्यांची गुन्हेगारी ही पारंपारीक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

*