नाशिक | प्रतिनिधी
लाँकडाऊन काळात ४९ जणांना घेऊन जाणारा कंटेनर आज पहाटे सातपूर पोलिसांनी जप्त केला असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पप्पु अब्दुल खान (२७, रा. भिवंडी, ठाणे, मुंबइ, मुळ उत्तरप्रदेश ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपुर जवळील पिंपळगाव बहुला येथे तपासणीनाक्यावर आज पहाटे एक संशयास्पद कंटेनर आढळून आला.
पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली असता यामध्ये ४९ पुरुष लपून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. हे सर्वजन भिवंडी, मुंबई येथून उत्तर प्रदेशकडे जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या सर्वांची रवानगी सातपूर, स्वारबाबानगर येथील मनपा शाळेत करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त मगलसिंग सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश हांडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.