देशात अजुनही मोदी लाट कायम, ४८ टक्के लोकांची मोदींना पसंती

0
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास कायम असून देशाला पुढे नेण्यासाठी सक्षम नेता म्हणून ४८ टक्के लोकांनी मोदींनाच पसंती दर्शवली आहे. प्रशांत किशोर यांच्या इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आय- पॅक) या संस्थेच्या ऑनलाइन सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटीने (IPAC) केलेल्या सर्वेक्षणामध्ये देशातील ९२३ नेत्यांचा पर्याय देण्यात आला होता. यात ५७ लाख लोकांनी आपली मते नोंदवली होती. नॅशनल अजेंडा फोरम अंतर्गत इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटीने केलेल्या सर्वेत ४८ टक्क्यांसह मोदी पहिल्या स्थानावर राहिले.

तब्बल ४८ टक्के लोकांनी मोदींना मत दिले आहे. राहुल गांधी ११ टक्के मतांसह दुसऱ्या तर अरविंद केजरीवाल ९.३ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानी आहेत. विशेष म्हणजे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे सात टक्के मतांसह चौथ्या स्थानी आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ४.२ टक्के मतांसह पाचव्या आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती ३.१ टक्के मतांसह सहाव्या स्थानी आहेत.

या अहवालावर अनेकांनी आक्षेप घेतला. हे ऑनलाइन सर्वेक्षण असून यात ग्रामीण भागातील जनतेचे मत समजू शकलेले नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणाबाबत विश्लेषकांनी म्हटले की, ऑनलाईन सर्वेला मर्यादा आहेत. देशातील सर्वात मोठा ग्रामिण भाग यात सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे यातून निघणारे निष्कर्ष बदलू शकतात. याबाबत IPAC च्या सदस्यांनी सांगितले की, या सर्वेचा उद्देशच इंटरनेट सुविधा असलेल्या लोकांपर्यंत पोहचणे हा होता. तो साध्य झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*