Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एसटीच्या स्मार्टकार्डसाठी ४७० जेष्ठ नागरिकांकडून नोंदणी 

Share
* एकाच संगणकावर काम असल्याने सिन्नरच्या पास वितरण कक्षासमोर जत्रा 
सिन्नर । अजित देसाई 
राज्य परिवहन महामंडळाने जेष्ठ नागरिकांसाठी बसभाड्यात ५० टक्के सवलतीसाठी स्मार्टकार्ड देण्याची योजना आणली आहे. या कार्डच्या माध्यमातून वर्षभरात ४ हजार किमी अंतराचा प्रवास सवलतीत करता येणार आहे. सिन्नर आगारामार्फत या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून अवघ्या ४ दिवसांत ४७० अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. पास वितरण कक्षात केवळ एकाच संगणकावर हि नोंदणी प्रक्रिया करण्यात येत असून काहीशा वेळखाऊ असणाऱ्या या प्रक्रियेमुळे त्याठिकाणी तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ जेष्ठ नागरिकांवर ओढवली आहे. पास नोंदणी करताना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात न आल्याने कक्षासमोर जत्रेचे स्वरूप बघायला मिळत आहे.  जागा मिळेल तेथे मांड्या घालून जेष्ठ नागरिक मेरा नंबर कब आयेगा अशी विनवणी करताना दिसत आहे.
एसटीच्या वर्धापनदिनी दि. १ जूनला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीचा प्रवास कॅशलेस करण्यासह तो स्मार्ट करता येईल यासाठी घोषणा केल्या. एसटीकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या मोफत व सवलतीच्या प्रवासासाठी यापुढे स्मार्टकार्ड सक्तीने देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मोफत प्रवास सवलत असणाऱ्या घटकांना या कार्डचे वितरण देखील करण्यात आले आहे. एसटीच्या साध्या व निमआराम गाड्यांमध्ये जेष्ठ नागरिकांना प्रवासीभाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येते. यासाठी आधारकार्डवर असणारी जन्मतारीख ग्राह्य  धरली जाते.
मात्र ६५ वयाच्या आतील अनेकजण आधारकार्डवरील जन्मतारखेत बदल करून एसटीच्या योजनेचा फायदा लाटताना दिसतात. जेष्ठ नागरिक म्हणून मिरवणाऱ्या या नकली प्रवाशांना रोखण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात स्मार्टकार्ड वितरित करताना जेष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. मतदान ओळखपत्र, आधारकार्ड व आधारकार्डशी संलग्न असणारा मोबाईल क्रमांक याआधारे प्रत्येक आगरस्तरावर ही नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
सिन्नर आगारात गेल्या शुक्रवार दि.७ पासून जेष्ठ नागरिकांना स्मार्टकार्ड देण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून एसटीच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीकरून त्यासाठी ५० रुपये आकारणी करण्यात येत आहे. नोंदणी झालेल्या जेष्ठ नागरिकास पावती देऊन दोन आठवडयांनी स्मार्टकार्ड मिळेल असे सांगण्यात येत आहे. एसटीच्या या स्मार्ट ओळखपत्रासाठी जेष्ठांकडून देखील प्रतिसाद मिळत असून अवघ्या ४ दिवसांत ४७० जणांची नोंदणी झाली असल्याचे आगारातून सांगण्यात आले. या नोंदणीसाठी सिन्नर बसस्थानकात असणाऱ्या पास वितरण कक्षात व्यवस्था करण्यात आली असून एक संगणक संच व तीन कर्मचारी यासाठी दिवसभर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पास वितरण कक्ष सकाळी ७ ते सायंकाळी  ७ यावेळेत सुरु  असला तरी जेष्ठ नागरिकांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. स्मार्टकार्डसाठी सकाळपासूनच जेष्ठांच्या रांगा लागत असून तास न तास रांगेत उभे राहणे शक्य  नसल्याने रांगेतच मांड्या घालून बसण्याचा फार्मुला वापरला जात आहे. या रांगेत कोणी  जाण्याचा प्रयत्न केल्यास भांडणे देखील रंगत आहेत. याशिवाय नोंदणी प्रक्रियेला वेळ लागल्यास एसटीच्या कर्मचाऱ्यांवर देखील तोंडसुख देखील घेतले जात आहे.
पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे 
पास वितरणं कक्षापासून प्रसाधनगृह दूर आहे. त्यामुळे लघुशंकेसाठी जायचे म्हटले तर नंबर जाणार नाहीना अशी भीती जेष्ठांच्या जाणवते. याशिवाय बसस्थानकात कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने समोरच्या कँटिनमधून पाणी विकत घेऊन प्यावे लागते बाटलीत आणलेले व बाहेरच्या वातावरणामुळे गरम झालेले पाणी जेष्ठाना प्यावे लागत आहे. बसस्थानकात गेला उन्हाळाभर कुठेही प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध होत नव्हते. बसस्थानक प्रशासनाकडून देखील याबाबत लक्ष . त्यामुळे प्रवाशांना १० रुपयांत मिळणारी थंड पाण्याची बाटली दुप्पट दरात विकत घ्यावी लागते. एसटीने किमान जेष्ठांसाठी तरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी  व त्यांना बसण्यासाठी प्रतिक्षालय सुरु करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
वाढीव संगणकांची मागणी 
जेष्ठ नागरिकांसोबतच विद्यार्थी व मासिक पाससाठी देखील स्मार्टकार्ड दिले जाणार आहेत. सिन्नरला चार दिवसांत जेष्ठांच्या स्मार्टकार्डसाठी केलेली नोंदणी नाशिक विभागातील उच्चांक आहे. उपलब्ध असलेल्या एका संगणकावर दिवसभरात केवळ १०० जणांची नोंदणी करणे शक्य आहे.
मात्र, तांत्रिक अडचणी आल्या तर हा लक्षांक गाठता येणार नाही. पुढच्या आठवड्यात शाळा महाविद्यालये सुरु होतील तेव्हा विद्यार्थ्यांच्या गर्दीला यावर घालणे कठीण होणार आहे. स्मार्टकार्डसाठी केवळ सिन्नर बसस्थानकातच नोंदणी करावी लागणार असून त्यासाठी नाशिक विभागीय कार्यालयाकडे आणखी तीन संगणक व आवश्यक उपकरणांची मागणी करण्यात आली आहे.
स्मार्टकार्ड साठी नोंदणी करणाऱ्या जेष्ठानी आपसात भांडू नये व  तांत्रिक अडचणी असल्यास एसटीच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन आगरव्यवस्थापक भूषण सूर्यवंशी, कनिष्ठ आगार व्यवस्थापक सविता काळे यांनी केले आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!