साईनाथ रूग्णालयात कर्मचार्‍यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

0
 दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने रूग्णांची पळापळ
शिर्डी (प्रतिनिधी)- साईनाथ रुग्णालयातील लॉन्ड्री विभागाच्या दोन कर्मचार्‍यांमध्ये किरकोळ वाद झाले. त्यानंतर दोन्ही कर्मचार्‍यांनी समर्थक बोलावून घेतल्याने रुग्णालयाच्या वाहनतळावर तुफान हाणामारी झाली. दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने रूग्णांची पळापळ झाली. सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत पोलिसांना पाचारण केल्याने पुढील अनर्थ टळला. घटना रविवार 12 वाजेच्या सुमारास घडली. या हाणामारीत दोन्ही कर्मचारी जखमी झाले.
साईनाथ रुग्णालयातील लाँन्ड्री विभागाचे कर्मचारी संजय कुहिले ड्युटीवर होते. त्यावेळी रंभाजी गागरे तेथे आले. त्यांनी कुहिले यांना झोपलेल्या अवस्थेत पाहिलेे. गागरे यांनी कुहिले यांना ड्युटीवर असताना कसे झोपले अशी विचारणा केली. यावरुन दोघांत वाद झाला. याप्रसंगी येथील काही कर्मचार्‍यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला.
दोन्ही कर्मचारी रुग्णालय जवळ असणार्‍या वाहनतळा जवळ गेले.तेथे दोघांचे समर्थक जमा झाले. तेथे दोन्ही गटात प्रचंड हाणामार्‍या झाल्या. या परिसरात रूग्णांचे नातेवाईक व रूग्ण थांबलेले असतात. अचानक हाणामार्‍या सुरू झाल्याने रूग्ण व नातेवाईकांची पळापळ झाली. हाणामारीत गागरे व कुहीले हे दोघे जखमी झाले.
सुरक्षारक्षकांनी परीस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन परस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहीती संस्थानचे प्रशासकीय अधिकारी औटी, वैद्यकीय प्रशासक डॉ. प्रितम वडगावर यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा अहवाल सोमवारी कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर यांना सादर करणार आहे.
दरम्यान, याबाबत रंभाजी गागरे यांनी शिर्डी पोलीसात फिर्याद दाखल केली असुन संजय कुहिले यांच्यासह संदेश कुहीले व दोन अन्य अनोळखी इसमांनी लाथाबुक्या व फाईटने डाव्या डोळ्यावर मारुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे. शिर्डी पोलीसांनी याबाबत गुन्हा रजि 224/2017 प्रमाणे दाखल केला आहे.

 

LEAVE A REPLY

*