…अन् ४५ गावे झाली दारुमुक्त ; पोलीस, महिलांच्या सहकार्याने नशामुक्तीच्या प्रयत्नाला यश

0
मोखाडा (माधुरी आहेर) | मोखाडा तालुक्यात जवळपास 45 गावांत दारुबंदी झाल्याने विशेषत: महिलांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
दारुविरोधात कारवाईबाबत राजकीय व्यक्तींच्या व संघटनांच्या दबावास पोलिसांनी बळी न पडता दारू विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करत असल्याने अधिकाधिक गाव, पाडे दारुबंदीसाठी स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत.

दारुबंदीमुळे घरगुती व आपसातील भांडणे कमी झाली असून अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. प्रथमत: पोलिसांनी चपलपाडा गावात दारुबंदीचा प्रयत्न केला. चपलपाडा येथे ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. लोकांना दारूचे दुष्परिणाम समजावून सांगितले.

मात्र यावेळी एका तरुणाने आम्ही दारुबंदी करणार नाही, असे पोलिसांना व ग्रामस्थांना ठणकावून सांगितले. त्यावेळी बैठकीला उपस्थित पोलीस निरीक्षक दत्ता भोये यांनी त्याची समजूत काढली व दारुविक्री सुरू ठेवल्यास केस नोंदवली जाईल, असा दम भरला.

त्यामुळे तरुण शांत झाला व सर्वानुमते दारुबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. दारुबंदीसाठी लोकांना आठ दिवसांची मुदत दिली. त्यानंतर दारुविक्री आढळून आल्यास कुणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

मात्र आठ दिवसांनंतरदेखील चपलपाडा येथील एका इसमाने दारुविक्री सुरू ठेवली. हे त्या गावात समजल्यावर काही महिलांनी स्वत: पुढाकार घेऊन दारुविक्रेत्याला पकडून ठेवले व पोलिसांना फोन केला. दरम्यानच्या काळात दारुविक्रेत्याने रॉकेल टाकून पेटवून घेण्याची धमकी दिली.

असे असतानाही त्या जिगरबाज महिलांनी संबंधित इसमाला सोडले नाही व पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याचा चांगला परिणाम होऊन गावातील छुपी दारुविक्रीदेखील बंद झाली. हे शेजारील गावातील नागरिकांंना समजल्यावर तेही दारुबंदीसाठी स्वतःहून पुढाकार घेऊ लागले.

नंतर धोंडमार्‍याची मेट, शिरसोनपाडा व कळमवाडी या गावांतील पोलीसपाटलांच्या पुढाकाराने गावातील ग्रामस्थांची बैठक घेऊन गावठी दारू तयार करणे व विकणे बंद करण्यात आल्याचा ठराव घेण्यात आला. त्याची प्रेरणा इतर गावांतील नागरिकांनी घेऊन पोलिसांच्या मदतीने गावागावांतील दारू यशस्वीपणे बंद केली.

आतापर्यंत मडक्याची मेट, कडूचीवाडी, कारेगाव, सूर्यमाळ, आडोशी, पाथर्डी, बोटोशी, करोळ, पाचघर, गोमघर, बनाची वाडी, किनिस्ते, काष्टी, केवनाळा, वाघ्याचीवाडी, साखरी, डोल्हारा, धामणशेत, कोशीमशेत, शेंड्याचीमेट, खोच, बोरीचापाडा, चारणवाडी, पिंपळपाडा, बेडूकपाडा, पोशेरा, मोरद्याचा पाडा, गोंदे बुद्रुक, गोंदे खुर्द, सातुर्ली, मोर्‍हांडा, मोरचुंडी, हिरवे, बेरिस्ते, ब्राह्मणगाव, निळमाती, शेरीचापाडा, चिकनपाडा, तोरणशेत या गावांत दारुबंदी करण्यात आली आहे.

दारुबंदीचा ठराव मंजूर झाल्यानंतरही काही दारुविक्रेत्यांनी दारूची विक्री सुरू ठेवली तर काही सुजाण ग्रामस्थ पोलिसांना फोन करून दारुविक्री चालू असल्याबाबतची माहिती देतात व तात्काळ त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे इतर दारुविक्रेते दारू विकणे बंद करतात. तसेच नद्या, ओहळे या ठिकाणी दारू लपवून ठेवल्याची माहिती मिळल्यास पोलिसांनी अनेक गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

दारुबंदीबाबत जनजागृती : दारुबंदीला ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक दत्ता भोये यांनी गावागावांत बैठका घेतल्या. यात पोलिसांनी ग्रामस्थांना दारूचे दुष्परिणाम समजावून सांगितले. दारू प्यायलेला माणूस विनाकारण शेजार्‍यांशी भांडण करतो, बायको, मुलांना त्रास देतो. एवढेच नव्हे तर दारूमुळे व्यक्तीच्या आरोग्याला धोका निर्माण होतो, याबाबत पोलिसांनी जनजागृती केली.
नागरिकांच्या सहकार्यानेच शक्य : नागरिक दारुबंदीसाठी अगोदर सहकार्य करत नव्हते; पण पोलिसांबद्दल विश्वासार्हता निर्माण झाल्यामुळे लोक दारुबंदीसाठी पुढाकार घेत आहेत. आता लोकांमध्ये अवैध धंद्यांविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत आली असून संपूर्ण मोखाडा तालुक्यात दारुबंदी होईल, असा विश्वास वाटतो.
दत्ता भोये, मोखाडा पोलीस निरीक्षक

LEAVE A REPLY

*