Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

44 वर्षांनी होणार वन कायद्यांत सुधारणा; फेब्रुवारी 2020 मध्ये मिळणार अहवाल

Share

नाशिक । भारत पगारे

मागील 44 वर्षांत भारतीय वन अधिनियम वगळता वन विभागाच्या विविध कायद्यात बदल करण्यात आलेले नाही. मात्र आता महसूल आणि वन विभाग वन विभागाशी निगडित नविन कायदे तयार करणार असून प्रचलित वनकायद्यांतही सुधारणा घडवून आणल्या जाणार आहे. फेब्रुवारी 2020 पर्यंत याबाबतचा अहवाल वनबल प्रमुख शासनाला सादर करणार आहेत.

सन 1976 पासून वने विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचित समाविष्ट करण्यात आला आहे. भारतीय वन अधिनियम वगळता मागील 44 वर्षांत वन विषयक विविध कायद्यांत कालानुरूप बदल करण्यात आलेले नाही किंवा वनांशी संबंधित कोणतेही नविन कायदे तयार करण्यात आलेले नाही. कांदळवन, निसर्ग, पर्यटन, बांबू विकास, खासगी वनांमध्ये वृक्ष लागवडीस चालना यासह अन्य बाबींसाठी नविन कायदे तयार करणे तसेच प्रचलित वन कायद्यात काही सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास केला जाणार आहे.

दरम्यान, वन कायदे तयार करण्यासाठी समिती स्थापण्यात आली आहे. त्यात राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) हे अध्यक्ष असून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक तथा केंद्रस्थ आधिकारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (संधारण) हे सदस्य आहेत. तर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) हे सदस्य सचिव आहेत. ही माहिती वन विभागाचे सहसचिव सुजय दोडल यांनी दिली आहे.

या संपूर्ण कार्यासाठी सेवानिवृत्त वनाधिकारी, न्यायाधिश, कायदेतज्ज्ञ, वकील यांचीचा समावेश केला जाणार आहे. यासह वेगवेगळ्या उपसमित्या तयार केल्या जाणार असून लगतच्या राज्यात कायदेविषयक कोणत्या तरतुदी आहेत, हे अभ्यासले जांणार आहे.
कायदेबदलासाठी आवश्यक बाबींच्या चर्चा व राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.

समितीची कार्य
* वन विषयक केंद्र व राज्य शासनाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व कायद्यांचा अभ्यास.
*या कायद्यांमध्ये कालानुरूप काही सुधारणा आवश्यक असल्यास तसा प्रारूप व समर्थनासह अहवाल सादर करणे.
वन संवर्धनास सहाय्यभूत होतील अशा इतर कायद्यांमध्ये सुधारणा सुचविणे.
कांदळवन, निसर्ग पर्यटन व वृक्ष लागवडीस चालना देणे इ. बाबींच्या शिफारस करणे.
29 फेब्रुवारी 2020 पर्यंत ही समिती शासनाला अहवाल सादर करतील. तसेच केलेल्या मासिक प्रगतीचा आढावा वनबल प्रमुख देतील.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!