तीन वीज बळी

0

कोपरगावातील तीन तर पाथर्डीतील महिला अत्यवस्थ

मृत देविदास जाधव
मृत लताबाई पवार
कान्हेगाव/इंदोरी (वार्ताहर) – जिल्ह्यात हस्त नक्षत्राच्या पावसाचे दणक्यात आगमन झाले आहे. या पावसासोबत सुरू असणार्‍या विजेचा कडकडाटचा फटका सातजणांना बसला असून दोन दिवसांत अंगावर वीज पडून तिघांचा मुत्यू झाला आहे.
तर अन्य चार महिला अत्यवस्थ असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील काही दिवसांत ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून जिल्हा प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
वारी (ता. कोपरगाव) येथे शुक्रवारी वीज पडून दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडून 24 तासही उलटत नाही, तोच संवत्सर शिवारात शनिवारी दुपारी पुन्हा वीज कोसळली. यात लताबाई संजय पवार (वय-35) ही महिला जागीच ठार झाली तर विमल नेवगे, सुंदर कुशल, लंकाबाई पवार या तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पाथर्डी तालुक्यातील

पिंपळगाव टप्पा येथे शनिवारी सायंकाळी 5 वाजता वीज पडून राधाबाई बाबासाहेब नाकाडे ही महिला 35 ते 40 टक्के भाजून जखमी झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील आंबड येथे शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या पावसात वीज पडून देविदास मारुती जाधव (वय-40) या शेतकर्‍याचा दुर्देवी मृत्यू झाला. कर्जत तालुक्यातील नागपूर येथे सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या वादळी पावसात वीज अंगावर कोसळून सचिन प्रेमराज निंबोरे मरण पावले आहेत.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील विलास कासार यांच्या शेतात व शेजारच्या शेतात 40 ते 50 महिला कांदा लागवडीचे काम करत होत्या. दुपारी एकच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी कांदा लागवडीचे काम सुरू असलेल्या शेतातच वीज कोसळली. विजेच्या कडकडाटानंतर शेतात असलेल्या सर्वच महिला जीव मुठीत धरून रस्त्याच्या बाजूला पळाल्या. यात लक्ष्मी अहिरे, आशा अहिरे, सोन्याबाई गायकवाड, मनीषा सोनवणे, मनीषा गायकवाड, संगीता गायकवाड, अलका सोनवणेे, सुनीता गायकवाड, रेखा गायकवाड, लता गायकवाड, सुनीता सावळेराम गायकवाड, छाया कुडेकर यांचा समावेश आहे. या सर्व महिला खडकी येथील आहेत.

जखमींना आधी उपचारासाठी संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू आहेत. कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी कोपरगाव रुग्णालयाला भेट दिली आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

अकोले तालुक्यातील हस्त नक्षत्राच्या अंतिम चरणात मुसळधार पावसाने सर्वदूर हजेरी लावली. आंबड परिसरामध्येही शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास पावसास सुरुवात झाली. पाऊस सुरु असतानाच विजांचाही मोठा कडकडाट सुरू झाला. यावेळी पाडाळणे रोडवरील जाधव वस्तीवर राहणारे जाधव हे जनावरांसाठी साचून ठेवलेला भुईमुगाचा पाला झाकण्यासाठी उठले होते. पाल्यावर प्लॅस्टिकचा कागद टाकत असताना अचानक विजेचा मोठा आवाज झाला व कडकडणारी वीज थेट जाधव यांच्या अंगावर कोसळली. यात जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन डॉक्टरांना उपचारासाठी पाचारण केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शनिवारी सकाळी अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून जाधव यांचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. रुग्णालयातच आ. वैभव पिचड, तहसीलदार मुकेश कांबळे यांनी नातेवाईकांची भेट घेऊन धीर दिला. खा. सदाशिव लोखंडे यांनीही आंबड येथे जाऊन जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. कामगार तलाठी बाबासाहेब दातखिळे, हवालदार बाळू पानसरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जाधव यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या अचानक जाण्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून परिसरामध्ये या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान शनिवारी दुपारी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या दोन दिवसांत वीज पडून तीन जणांचा बळी गेला असून यात कोपरगाव, अकोले आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा तर कोपरगावमध्ये 3 तर पाथर्डीत 1 अशा चार जखमी महिलांचा समावेश आहे.

अतिवृष्टीचा इशारा  –
दरम्यान, 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान उत्तर-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. यामुळे नदी काठावर राहणार्‍या नागरिकांसह अन्य सर्व नागरिकांनी सावध राहावे अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. या काळात नदीच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका, घाट रस्त्याने प्रवास टाळा, ओढे, नाले ओलांडू नका, कामशिवाय घरा बाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*