व्यापारी बँकेच्या निवडणुकीत 34.63 टक्के मतदान

0
नाशिकरोड । किरकोळ शाब्दिक चकमक वगळता येथील नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे मतदान काल शांततेत संपन्न झाले. या निवडणुकीत काल एकूण 34.63 टक्के मतदान झाले असून आज दि. 26 रोजी सकाळी 8 वाजेपासून येथील के.एन. केला स्कूलमध्ये मतमोजणीला प्रारंभ होऊन सायंकाळी 8 वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.

व्यापारी बँकेच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी शनिवारी संपल्यानंतर काल रविवारी एकूण 11 केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सर्वच ठिकाणी मतदारांचा उत्साह होता.

परंतु मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवल्याने 61,397 मतदारांपैकी फक्त 21,264 इतके मतदान झाले आहे. जेलरोड येथील के.एन. केला स्कूल व दत्तमंदिर रोडवरील शाळा क्र. 125 च्या मतदान केंद्रावर दोन्ही पॅनलच्या उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक चकमकीचे प्रकार घडले. परंतु पोलीसांनी हस्तक्षेप करून हे वाद मिटवले.

मतदारांना आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनांचा वापर करण्यात आला होता. मतदानाच्या दरम्यान पाऊस पडेल असे वाटत होते. परंतु पावसाने काल दांडी मारली. त्यामुळे मतदानाच्या दरम्यान पाऊस झाला नाही. या निवडणुकीत सहकार पॅनलचे नेतृत्व माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे हे करत आहे.

या निवडणुकीत आमचाच विजय निश्चित होईल व पुन्हा सहकार पॅनल सत्तेत येईल, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. तर श्रीव्यापारी पॅनलचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे करत असून कुठल्याही परिस्थितीत या निवडणुकीत परिवर्तन होऊन श्रीव्यापारी पॅनल सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*