नोकरीच्या आमिषाने ३ लाखांचा गंडा आदिवासी विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून लूट

0

नाशिक | दि. १ प्रतिनिधी – आदिवासी विकास विभागातील मोठे अधिकारी असून या विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नांदगाव तालुक्यातील बेरोजगारास ३ लाख रुपयांना गंडा घालणार्‍या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोमनाथ विठ्ठल डाबल (३७, रा. शांतीनगर, मखमलाबादरोड), राजेश राम रोहिडा (४२, रा. दत्तनगर, पेठरोड), राजेंद्र सहदेव मोरे (४५, रा. लक्ष्मीनगर, नांदगाव) व हेमचंद्र विष्णू आहिरे (६२, रा. क्रांतीनगर, मखमलाबाद) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील साहेबराव रामभाऊ शेवाळे (रा. सौंदाणे, ता.नांदगाव) हा त्यांचा साथीदार अद्याप फारार आहे.

या प्रकरणी संदीप बाळू सानप (रा. कासारी, ता.नांदगाव) या बेरोजगार युवकाने नाशिक शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सानप हा शासकीय नोकरीच्या शोधात असताना त्याची राजेंद्र मोरे या शिक्षकाशी भेट झाली. त्याने अन्य संशयित साथीदार आदिवासी विकास विभागात उच्चपदावर अधिकारी असल्याचे भासवून हा गंडा घातला.

आदिवासी विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून संशयितांनी साडेसात लाख रुपयांची मागणी केली होती. यावेळी प्रारंभी दीड लाख स्वीकारत उर्वरित रक्कम नोकरी लागल्यावर देण्याचे ठरले होते. कालांतराने संशयितांनी अधिकार्‍यांचे बनावट सही-शिक्के तयार करून नोकरीची ऑर्डर पोस्टाने पाठवली.

त्यामुळे सानप यांचा विश्‍वास बसल्याने पुन्हा दीड लाख रुपये उकळण्यात आले. त्यानंतर या विभागाच्या दुसर्‍या मजल्यावर अधिकारी असल्याचे भासवून संशयितांनी मुलाखत घेत रजिस्टरवर स्वाक्षरी घेतली. यानंतर वैद्यकीय चाचणीचे रितसर बनावट पत्र देण्यात आल्याने जिल्हा रुग्णालयातील सोपस्करही पार पडले.

मुलाखतीसाठी या विभागाचा सुरक्षारक्षक राजेश रोहिडा यास अधिकारी असल्याचे भासवण्यात आल्याने या घटनेेचे बिंग फुटले. नोकरी पक्की झाल्याच्या आविर्भावात युवकाने आदिवासी विकास विभाग गाठले असता रोहिडा हा अधिकारी नसून सुरक्षारक्षक असल्याचे निदर्शनास आल्याने त्याने थेट पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची भेट घेत या प्रकराची माहिती दिली.

पाटील यांच्या आदेशाने तात्काळ सर्वांची चौकशी केली असता नोकरीचे सर्व कागदपत्र बनावट असल्याचे उघड झाले. उपायुक्त पाटील यांनी थेट युवकास मुंबई नाका पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने चौघा संशयितांना तात्काळ अटक करण्यात आली. या टोळक्यातील साहेबराव शेवाळे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहायक निरीक्षक मनीषा घोडके करीत आहेत.

नोकरीचा शॉर्टकट सोडा
सरकारी नोकरी असे पैसे भरून मिळत नसते. यासाठी शासनाच्या त्या-त्या विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होतात. रितसर परीक्षा होतात. त्यामध्ये चांगल्या गुणांनी पास होणार्‍यांना रितसर मुलाखत होऊन नोकरी दिली जाते. पैसे भरून शॉर्टकर्टने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी युवकांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून परीक्षा द्यायला हव्यात. अन्यथा असे लाखो रुपयांना फसवले जाते. यामुळे युवकांनी सावध राहावे.
– लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

LEAVE A REPLY

*