Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

दुसरीच्या संख्यावाचनात आता नवी पद्धत

Share

‘बत्तीस’ ऐवजी ‘तीस दोन’, शिक्षक आणि पालक गोंधळात

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील शैक्षणिक वर्षात बालभारतीद्वारे इयत्ता पहिली, आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. आता या शैक्षणिक वर्षापासून गणिताच्या अभ्यासक्रमातील संख्या वाचनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या नव्या बदलानुसार विद्यार्थ्यांना ‘एकवीस’ऐवजी‘वीस’एक, पासष्ठऐवजी ‘साठ पाच’, अशा नव्या पद्धतीने संख्यावाचन करावे लागणार आहे. नुकतेच बालभारतीकडून इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रमात हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयाचा अभ्यास करणे सोपे जाणार असेल, तरी गणित विषयांच्या शिक्षकांची तसेच पालकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.

गणित हा विषय मुलांना फारसा आवडत नाही, या विषयाची भीती मुलांमध्ये असते. तसेच यातील संख्यावाचनातील जोडाक्षरे मुलांना बोलताही येत नाही. त्यामुळेच अनेक विद्यार्थी गणित विषयात नापास होतात. हे लक्षात घेऊन बालभारतीने इयत्ता दुसरीच्या पुस्तकात शैक्षणिक 2019-20 या वर्षापासून महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलानुसार विद्यार्थी आता संख्यावाचन करताना ही नवी पद्धत अमलात आणली आहे. या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना जोडाक्षरांची आणि गणिताची भीती मनात राहणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना जोडाक्षरे लिहावी लागणार नाहीत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना संख्या वाचन करणे अधिक सुलभ होईल यादृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. पण या बदलामुळे पहिली दुसरीच्या पालक व शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.

अशा पद्धतीने इंग्रजी तसेच कानडी, तेलगू, मल्याळी आणि तामिळ या दक्षिण भारतीय भाषांमध्ये संख्यावाचन शिकवले जाते. मराठी भाषेत मात्र त्र्याहत्तर, एक्याण्णव, सव्वीस अशा पद्धतीनेच संख्यावाचन करण्याची पद्धत सुरू होती. पण यंदाच्या वर्षीपासून यात बदल करण्यात आला आहे. हा बदल विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा मानला जात आहे. ज्येष्ठ गणितज्ज्ञ मंगला जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास मंडळाने हा बदल सुचवला आहे. त्यानुसार बालभारतीने नवीन पुस्तक छापून तो अमलात आणला आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!