जिल्ह्याला दुसर्‍या टप्प्यात 296 कोटींचा मदतनिधी

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे नगर जिल्ह्यासह राज्यात अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकर्‍यांना विशेष दराने मदत देण्यासाठी आकस्मितता निधीतून 4 हजार 500 कोटी इतका निधी दुसर्‍या हप्त्यापोटी वितरीत करण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. यापैकी नगर जिल्ह्याच्या वाट्याला 296 कोटी 20 लाख 13 हजार रुपयांचा निधी येणार आहे. याचा फायदा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या तब्बल 3 लाख 86 हजार 158 शेतकर्‍यांना होणार आहे.

नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या तब्बल 3 लाख 86 हजार 158 शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा होती. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात बाधित झालेल्या शेतकर्‍यांची संख्या 6 लाख 34 हजार 33 आहे. शेतपिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला 135 कोटी 55 लाख 9 हजारांचा अनुदानाचा पहिला टप्पा प्राप्त झाला होता. त्यामधून शेतकर्‍यांपैकी 2 लाख 47 हजार 815 शेतकर्‍यांनाच मदत देणे शक्य झाले.

गेल्यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाण्याअभावी गेल्यावर्षी खरिपासोबतच रब्बी हंगामही वाया गेला होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते.

दुष्काळाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना यंदा चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील पिके जोमात होती. प्रत्यक्षात मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके अतिवृष्टीमुळे गेल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडले.

अतिवृष्टीमुळे 4 लाख 54 हजार 12 हेक्टरचे क्षेत्र बाधित झाले असून बाधित शेतकर्‍यांची संख्या 6 लाख 34 हजार 33 आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये अंदाजे 475 कोटींचे नुकसान झाले आहे. पंचनामे झाल्यानंतर तसा अहवाल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी राज्य सरकारला पाठविला होता. त्यातच या नुकसानीपोटी राज्य सरकारने मदत जाहीर केली, व नगर जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 135 कोटी 55 लाख 9 हजार रुपयांचे अनुदान पाठविले. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या पैशातून शेतपिकांच्या नुकसानीपोटी 2 लाख 47 हजार 875 शेतकर्‍यांना मदत देणे शक्य झाले आहे. या शेतकर्‍याच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहेत.

शेतीपिकांसाठी 8000 प्रतिहेक्टर, फळबागांसाठी 18 हजार प्रतिहेक्टर आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
शेतीपिके/ फळबागांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मयादेपर्यंत मदत मिळेल.
नुकसानीकरिता मदत 33 टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांनाच मिळणार आहे.
नुकसानीसाठी मदतीची किमान रक्कम 1000 तसेच बहुवार्षिक पिकांसाठी मदतीची किमान रक्कम 2000 रुपये राहील.
मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बंँकांना वसुली करता येणार नाही.

आज शनिवार आणि उद्या रविवारची सुट्टी असल्याने जिल्हा प्रशासनाला सोमवारी हा निधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तालुकानिहाय तसेच गावनिहाय निधी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे.