तळेगावच्या 28 युवकांवरील गुन्हे मागे घ्या

0

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संगमनेर (प्रतिनिधी) – तळेगाव येथील 28 निरापराध युवकांवर गटा-तटाच्या राजकारणातून तालुका पोलिसांनी 15 नोव्हेंबर 2014 रोजी विविध कलमान्वये दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नागपूर येथे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी बुधवारी भेट घेतली. त्यांना याबाबतचे सविस्तर निवेदन देऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. गुन्हे दाखल असलेल्या या युवकांनी अधिवेशनादरम्यान विखे पाटील यांची भेट घेऊन दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यांमुळे झालेल्या अन्यायाकडे व यामुळे होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधले होते.

तळेगाव येथे 15 नोव्हेंबर 2014 रोजी स्थानिक युवक सायंकाळी दूध घालण्याच्या निमित्ताने एकत्रित जमले होते. यादरम्यान भरधाव वेगाने आलेल्या एका वाहनातील अनोळखी लोकांनी स्थानिक लोकांना मागून येणार्‍या ट्रकमध्ये गोमांस असल्याची माहिती दिली. या वाहनातील अनोळखी लोकांनीच सदर ट्रक पुढे अडविला. या दोन्ही वाहनांतील चालक-क्लीनर यांच्यात बाचाबाची झाली. याच दरम्यान या ट्रकने पेट घेतला. स्थानिक नागरिक त्याठिकाणी गेलेले असल्यामुळे त्यांच्याकडून ट्रकला आग लावण्याचा प्रकार घडणे असंभव आहे. उलट वाहनातून आलेले अनोळखी इसमच तयारीने गाडीचा पाठलाग करीत असल्याने त्यांनीच आग लावली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली.

घटना घडल्यानंतर पोलिसांनी आपले अपयश झाकण्यासाठी स्थानिक गटातटाच्या राजकारणास बळी पडून नाहकच या 28 युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. वास्तविक ट्रकच्या पूर्वी आलेल्या वाहनातील इसमांवर व गोमांस वाहतूक करणार्‍या वाहन मालक व चालकांवर गुन्हा दाखल होणे आवश्यक असताना केवळ घटना पाहण्यासाठी जमलेल्या निरपराध युवकांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अन्याय केला असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
गुन्हे दाखल असलेले काही युवक अद्यापही शिक्षण घेत आहेत. निरपराध युवकांवर नाहक गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या भवितव्याबाबत अडचणी निर्माण झाल्या असून याच कारणाने या युवकांना स्थानिक पातळीवर राजकारणामध्ये वेठीस धरण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*