25 टक्के प्रवेशाची 3 हजार विद्यार्थ्यांना लॉटरी! ; आरटीईअंतर्गत वंचित घटकांना दर्जेदार शाळेत प्रवेश

0

नाशिक  : शिक्षण हक्क कायद्यानुसार राबवण्यात आलेल्या ऑनलाईन 25 टक्के प्रवेश प्रक्रियेत वंचित घटकांच्या सुमारे 3 हजार 137 बालकांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची लॉटरी लागली आहे. त्यात 207 असे विद्यार्थी आहेत की एकापेक्षा अधिक शाळांमध्ये त्यांचा नंबर लागला आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शासकीय कन्या विद्यालयात नोंदणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष प्रवेशासाठी आज लॉटरी काढण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कोळी आदींसह पालक उपस्थित होते. ज्या विद्यार्थ्यांची नावे लॉटरीत निघाली त्या पालकांना एसएमएसद्वारे माहिती कळवण्यात आली.

25 टक्के प्रवेशासाठी सुमारे 6615 जागा आहेत. लॉटरीसाठी 6380 ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते. लॉटरीची पहिली फेरी आज राबवण्यात आली. त्यात 3137 विद्यार्थ्यांची नावे प्रवेशासाठी निघाली आहेत, तर 207 विद्यार्थ्यांची नावे एकापेक्षा अधिक शाळांसाठी निघाली आहेत. दुसरी लॉटरी येत्या 20 मार्चला काढण्यात येणार आहे.

येत्या शैक्षणिक सत्रासाठी प्राथमिक पूर्व आणि प्राथमिक शिक्षणासाठी आरटीईअंतर्गत 25 टक्के प्रवेश देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने हा उपक्रम प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबवला आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातून 25 टक्के प्रवेशासाठी आर्थिक आणि वंचित घटकांच्या पालकांनी 12 हजार 606 अर्ज केले होते. त्यापैकी 6583 अर्ज अपूर्ण होते. तर 6 हजार 24 अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली होती. तसेच काही पालकांनी एकापेक्षा जास्त शाळांत अर्ज केले होते . त्यात एक किलोमीटरच्या आतील शाळांसाठी 4 हजार 520 अर्ज होते. 3 किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांसाठी सुमारे 11 हजार 866 अर्ज आले होते. तर 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या पुढे असलेल्या शाळांसाठी सुमारे 1 हजार 655 अर्ज पालकांनी ऑनलाईन दाखल केले होते.

पालकांनी हे करावे : लॉटरीच्या पहिल्या फेरीत ज्या बालकांची नावे नमूद शाळांमध्ये प्रवेशासाठी जाहीर झाली आहेत अशा बालकांच्या पालकांनी त्या शाळेत जाऊन 15 मार्चपर्यंत प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकार्‍यांनी केले आहे. अर्जात नमूद कागदपत्रे शाळेत जमा करावीत. तसेच एकापेक्षा अधिक शाळेत कागदपत्रे देऊ नयेत. अ‍ॅडमिट कार्ड सोबत बाळगावे.

शाळांची जबाबदारी : शाळांनी नमूद कागदपत्रेच स्वीकारावीत. त्यापेक्षा दुसर्‍या कागदपत्रांची मागणी पालकांकडे करू नये. तसेच ऑनलाईन प्राप्त झालेल्या यादीनुसार शाळांनी विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी. त्याचबरोबर विद्यार्थी प्रवेशाचे स्वतंत्र रेकॉर्ड ठेवण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने खासगी शाळांना दिलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

*