25 टक्के प्रवेशांसाठी 19,978 अर्ज ; प्रक्रिया 6 मार्चपासून सुरु होणार

0

नाशिक : 25 टक्के प्रवेशांतर्गत शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यात येणार आहेत. या शाळांमध्ये अर्ज करण्यासाठी 2 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात 6 हजार 686 पालकांनी 395 शाळांमधील उपलब्ध जागांसाठी 19 हजार 978 अर्ज केले. त्यात सिम्बॉयसिस शाळेतील 35 जागांसाठी सर्वाधिक 832 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर त्याखालोखाल गुरू गोविंद सिंगच्या 60 जागांसाठी 778 अर्ज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत.

अर्ज केलेल्यांपैकी 1 लीच्या आत प्रवेशासाठी 4 हजार 911 अर्ज आले आहेत. तर 3 रीच्या आत प्रवेशाकरिता 13 हजार 183 अर्ज आले आहेत. 3 रीच्या पुढे -1 हजार 884 अर्ज प्राप्त झाले आहेत. 65 शाळांमधील उपलब्ध जागांसाठी एकही अर्ज प्राप्त भागातील बहुतांशी जागांंचा समावेश आहे.

नाशिक शहरातील 25 टक्के प्रवेश पात्र असलेल्या सर्व 100 शाळांकरिता (नर्सरी -4 शाळा व इ.1ली -96 शाळा ) ऑनलाईनद्वारे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यासाठी आता पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असून 6 मार्चला दुपारी 1 वाजता वाजता शासकीय कन्या विद्यालय नाशिक येथे लॉटरी काढण्यात येणार आहे.

लॉटरी लागलेल्या व न लागलेल्या सर्व पालकांना जिल्हा परिषदेद्वारे कळविण्यात येणार आहे. लॉटरी लागलेल्या पालकांनी साइटवरूनच आपली प्रत डाऊनलोड करून प्रिंट काढावी. तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रासह 15 मार्च 2017 पर्यंत शाळेत प्रवेश घ्यावा. एका पेक्षा जास्त शाळेत लॉटरी लागली तरी आवडीच्या कोणत्याही एकाच शाळेत 15 मार्चपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

ऑनलाईन अर्जात दावा केलेल्या माहितीचा पुरावा म्हणून साइटवर दिलेल्या कागदपत्राच्या यादीतीलच कागदपत्रे स्वीकारली जाणार आहेत. दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करू न शकल्यास प्रवेश रद्द केला जाणार आहे व अशा विद्यार्थ्यांचा पुढील फेर्‍यांकरितासुद्धा विचार केला जाणार नाही. प्रवेशाबाबत काही तक्रार असल्यास मनपा क्षेत्रात प्रशासन अधिकारी व ग्रामीण क्षेत्रात गटशिक्षणाधिकारी यांचेकडील तक्रार निवारण समितीकडे तात्काळ तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*