241 गावांत जलयुक्तची होणार नवीन कामे

0

श्रीरामपूर 1, राहाता 4 तर संगमनेर, अकोले सर्वाधिक

अहमदनगर (प्रतिनिधी)- सन 2017-18 या वर्षात जलयुक्तची कामे करण्यासाठी जिल्ह्यातील 241 गावांची निवड करण्यात येत आहे.दरम्यान जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी जलयुक्तच्या कामाचा तब्बल तीन तासांच्या बैठकीत आढावा घेतला.
गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी नविन जलयुक्तच्या कामांची निवड केली जाते. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात 240 गावांची निवड करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचारी त्या गावात शिवार फेरी व ग्रामसभेच्या माध्यमातून कामाची व ठिकाणाची निवड करताना दिसून येत आहेत. यामध्ये संगमनेर व अकोले तालुक्यातील सर्वाधिक गावांची संख्या आहे. याउलट श्रीरामपूर तालुक्यातील एकाच गावाचा यामध्ये समावेश आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार पाणी टंचाई व दुष्काळा तोंड दिले. त्यावर उपाययोजना म्हणून शासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे हाती घेतली.त्यामुळे गतवर्षी काही दिवस का होईना आलेल्या पावसाचे पाणी अडवून त्याचे संवर्धन करण्यात यश आले. अन् त्याचा फायदा सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येत आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणात असलेल्या पाण्याच्या टँकरच्या संख्येत घट झाली आहे. कृषी विभाग, स्थानिक व राज्य लघुपाटबंधारे विभाग, सामाजिक वनिकरण, वनविभाग आदींच्या कामांचा आढावा प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेतला जातो.
दरम्यान मंगळवारी जिल्हाधिकारी महाजन यांचा पहिलाच दिवस अन् त्याच दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत आढावा सुरू होता. जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडे जलसंधारणचे खाते आहे. त्यामुळे सर्वच संबंधित विभागासह तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या कामगिरीची पावती म्हणून जलयुक्तच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्ह्याला पुरस्कार मिळाला. त्यामुळे आता जबाबदारीत वाढ झाली.
पुरस्कार मिळवून शाबासकी मिळविणारे सर्वच विभाग पुन्हा जोमाने कामाला लागले असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. त्यातच नविन जिल्हाधिकार्‍यांनी जलयुक्तसाठीच प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या वर्षात जलयुक्तच्या कामांची परिस्थिती कशी राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गतवर्षीचे 1960 कामे अपूर्ण
सन 2016-17 मध्ये संबंधित सर्व विभाग मिळून 268 गावांत 10 हजार 992 कामे प्रस्तावित होती. त्यापैकी 5 हजार 295 सुरू, 3 हजार 335 पूर्ण तर, 1960 अपूर्ण असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.सदर कामे जून अखेर पूर्ण करण्यासाठी डेडलाईन देण्यात आली.

तालुकानिहाय नवीन कामे
नगर-20, पारनेर-28, पाथर्डी-17, कर्जत-34, श्रीगोंदा-11, जामखेड-12, श्रीरामपूर- 1, राहुरी-6, नेवासा-10, शेवगाव-13, संगमनेर, अकोले प्रत्येकी 38, कोपरगाव-9, राहाता-4 आदी गावांचा समावेश आहे. 

LEAVE A REPLY

*